लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दीपावलीनिमित्त लक्ष्मी पूजनासाठी पाटावर ठेवलेल्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा चार लाख सात हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ढवळेश्वर परिसरातील गोपालनगरात शुक्रवारी रात्री ११ वाजेपासून शनिवारी पहाटे पाचच्या दरम्यान ही घटना घडली.येथील गोपालनगरात ज्ञानेश्वर मुरलीधर हिवाळे (३५) यांचे निवासस्थान आहे. हिवाळे कुटुंबिय दिवाळीचे महालक्ष्मी पूजन थाटामाटात करतात. यंदा हिवाळे कुटुंबियांनी स्वयंपाकघरात लक्ष्मीपूजा मांडली होती. पूजनासाठी रोख दोन लाख रुपये तसेच सोन्याचे दागिने ठेवले होते. पूजा संपल्यानंतर दागिने व रोख रक्कम तशीच होती. शुक्रवारी रात्री हिवाळे कुटुंबिय झोपले असता, चोरट्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पूजेसाठी ठेवलेली रोख रक्कम व दागिने चोरून नेले. सकाळी जाग आल्यानंतर हिवाळे यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. पूजेसाठी ठेवलेली रक्कमही गायब होती. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक योगेश गावडे, सहायक निरीक्षक अनिल परजने, उपनिरीक्षक नजीर शेख यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने जालना-भोकरदन मार्गापर्यंत माग काढला, त्यानंतर ते तिथेच घुटमळले. या प्रकरणी ज्ञानेश्वर हिवाळे यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत. दरम्यान, जालना शहरासह जिल्ह्यात गत काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. बाहेर गावी जायचे असल्यास शेजा-यांना, तशी माहिती द्यावी. शक्य असेल तर सीसीटीव्ही बसवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पूजेसाठी ठेवलेल्या दागिन्यांसह रक्कम लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:59 AM