उस्मानाबाद : कुटुंब कल्याण, माता व बालसंगोपन आणि नियमित लसीकरण कार्यक्रमात एक ते दीड वर्षांपूर्वी २५ व्या स्थानावर असलेल्या उस्मनाबादच्या आरोग्य विभागाने पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे. तर दुसरीकडे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखला जाणारा लातूर जिल्हा ३० व्या स्थानावर आहे.साधारणपणे एक ते दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सातत्याने चर्चेत असायचा, तो वेगवेगळ्या तक्रारींमुळे. प्रत्येक सर्वसाधारण सभेत आरोग्ये यंत्रणा सदस्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असायची. कधी डॉक्टरांच्या रिक्त जागांवरून, कधी बंद असलेल्या शस्त्रक्रियागृहांवरून तर कधी आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवरून सभागृहामध्ये वादळी चर्चा व्हायची. अनेकवेळा थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर पैसे घेतल्याचे आरोप होत होते. त्यानंतर काही दिवसांतच खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारीच लाच घेताना पकडले गेले. त्यामुळे या विभागाची प्रतिमा प्रचंड मलिन झाली होती. त्यानंतर काही दिवसांनीच जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. आर. बी. पवार यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने आरोग्य विभागाची प्रतिमा सुधारण्यास सुरूवात झाली. कुटुंब कल्याण कार्यक्रमावर शासन लाखोंचा खर्च करीत आहे. असे असतानाही जिल्ह्यात हा उपक्रम ठप्प होता. कारण प्राथमिक आरोग्य केंद्रातील ७० टक्के आॅपरेशन थिअटर बंद होते. हे सर्व थिअटर सुरू केल्यामुळे कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचा आलेख उंचावला असून जिल्हा यात पहिल्या स्थानावर पोहोंचला आहे. तसेच रुग्णालयीन प्रसुतींच्या प्रमाणातही वाढ झाली. जेथे वर्षभरात ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळून अडीच ते तीन हजार प्रसुती होत असत. तेथे चालू वर्षात अवघ्या चार महिन्यात प्रसुतींचा आकडा दीड हजारावर जावून ठेपला आहे. वर्षाअखेर (२०१५-१६) प्रसुतींची ही संख्या सहा हजारावर पोहोंचेल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी व्यक्त केला. माता व बालसंगोपन उपक्रमालाही गती मिळाली आहे. गरोदर माता आणि बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणातून समोर आलेल्या माता-बालकांना वेळेवर औषधोपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेकडून ‘मातृत्व संवर्धन दिन’ साजरा केला जातो. आरोग्य केंद्रात हा उपक्रम घेवून एकही बालक औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. याही उपक्रमात जिल्हा अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, नियमित लसिकरणातही जिल्हा पिछाडीवर होता. कधी वाहन नसल्याने तर कधी नियोजनाअभावी लस वाटप ठप्प व्हायचे. हाही प्रश्न मार्गी लागल्याने आता प्रत्येक महिन्याला आरोग्य केंद्रावर जावून लस वाटप केले जात आहे. यासाठी शासनाने सोयीसुविनायुक्त अशी व्हॅन जिल्हा परिषदेला दिली आहे. त्याचाही चांगला फायदा होत असल्याने याही उपक्रमात जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. (प्रतिनिधी)प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आॅपरेशन थिअटरची उभारणी करण्यात आली होती. परंतु, विविध कारणांमुळे जवळपास ७० टक्के प्रसुतीगृह (आॅपरेशन थिअटर) वापरात नव्हते. त्यामुळे रूग्णालयीन प्रसुतींचा आलेख खालावला होता. २०१४ मध्ये माकणी सारख्या आरोग्य केंद्रात महिन्याकाठी सरासरी तीन प्रसुती झाल्या आहेत. काही ठिकाणी चार तर काही ठिकाणी पाच असे प्रमाण होते. हे चिंताजनक चित्र लक्षात घेवून सर्व आरोग्य केंद्रांच्या प्रसुतीगृहांची दुरूस्ती करण्यात आली आहे. तसेच सर्जनचीही कमतरता होती. त्यामुळे आरोग्य केंद्रावरील डॉक्टरांनाच प्रशिक्षित करण्यात आले आहे. परिणामी अवघ्या चार महिन्यात रूग्णालयीन प्रसुतींची संख्या १ हजार ५३५ वर जावून ठेपली. उवर्रित आठ महिन्यात हा आकडा ६ हजार १४० वर जावून ठेपेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट असणार आहे.
उस्मानाबादचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल !
By admin | Published: August 27, 2015 12:00 AM