छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जात आणि ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी या मागास प्रवर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आतापर्यंत समाज कल्याण विभागामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जात होती. आता ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग अस्तित्वात आला आहे. या विभागाला महाडीबीटी प्रणालीवर अनुज्ञेय १५५४ अभ्यासक्रम मॅपिंग करण्यास शासनाने मान्यता दिल्यामुळे आता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातून इतर मागास बहुजन कल्याण हा विभाग नव्याने निर्माण झाला आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्तीच्या बहुंताश योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीही राबविल्या जातात. सामाजिक न्याय विभागाने ज्या अभ्यासक्रमासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता देण्यात येतो, ते सर्व अभ्यासक्रम महाडीबीटी प्रणालीवर मॅपिंग केलेले आहेत. मात्र, इतर मागास बहुजन कल्याण विभागाने अनुज्ञेय अभ्यासक्रमाचे अभ्यासक्रम मॅपिंग केलेले नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले होते. याकडे राज्यभरातील संस्था चालक, विद्यार्थी आणि पालकांनी शासनाचे लक्ष वेधले होते. याबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने उच्च व तंत्रशिक्षण प्रस्ताव सादर केला होता. त्यावर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने आपल्या स्तरावर योग्य निर्णय घ्यावा, असा अभिप्राय दिलेला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरणसमाज कल्याण विभागाने महाडीबीटी प्रणालीवर मॅप केलेल्या अभ्यासक्रमामधील द्विरुक्त झालेले अभ्यासक्रम, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम वगळता इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अनुज्ञेय १५५४ अभ्यासक्रम मॅपिंग करण्यास शासनाने १४ जूनच्या निर्णयाद्वारे परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.