औरंगाबाद : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर दोन्ही गटांकडून बुधवारी (दि. ५) मुंबईत दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी नेतेमंडळी विमानाने, तर कार्यकर्ते बस आणि चारचाकी वाहनांनी रवाना झाल्याचे समोर आले.
मुंबईतील शिवतीर्थावर शिवसेनेचा, तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिकांना नेण्याचे उद्दिष्ट दोन्ही गटांनी ठेवले आहे. औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिंदे गटाचे औरंगाबादचे पालकमंत्री, रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाट,आ. प्रदीप जैस्वाल, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या मतदारसंघातून जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिकांना नेण्याचे नियोजन केले. सत्तार हे स्वत: त्यांच्या चारचाकी वाहनाने कार्यकर्त्यांच्या वाहनांसोबत मुंबईला निघाले, तर आ. संजय शिरसाट आणि आ. जैस्वाल हे मंगळवारी सायंकाळी विमानाने मुंबईला रवाना झाले. मंत्री संदीपान भुमरे हे सकाळी विमानाने मुंबईला जाणार आहेत. शिवसेनेनेही मेळाव्याला जास्तीत जास्त नागरिकांना नेण्यासाठी विविध बैठका घेतल्या. त्यानुसार जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातून ३० ते ४० चारचाकी वाहने आजच रवाना झाली. शिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी हे उद्या सकाळी विमानाने मुंबईला जाणार आहेत.
वाहने भाडे तत्त्वावर घेतलीशिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना मुंबईला नेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने शहरातील विविध ट्रॅव्हल्सकडून काही बस आणि खाजगी चारचाकी ट्रॅक्स, कार भाड्याने घेण्यात आली आहेत. आ. जैस्वाल यांच्या कार्यलयापासून पहाटे पाच वाजता, आ. शिरसाट यांच्या कार्यालयापासून सकाळी आठ वाजता वाहने रवाना होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कामगार सेनेच्या वतीनेही २५ ते ३० चारचाकी वाहनाने कामगार मेळाव्यास जाणार आहेत.
वाहनांवर स्टीकर आणि झेंडेशिवसेना शिंदे गटाने प्रत्येक वाहनांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छायाचित्रे असलेले स्टीकर आणि भगवे झेंडे लावण्यात आले होते.