वैजापूर : समृद्धी महामार्गावरील बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे तालुक्यातील गावरस्ते, प्रमुख जिल्हा मार्ग, अन्य जिल्हाअंतर्गत मार्ग असे सुमारे दीडशे किमी लांबीच्या रस्त्यांची वाट लागली आहे. या रस्त्यांचे कामे नोव्हेंंबर २०२० अखेर करण्याचे आश्वासन समृद्धीचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या प्रशासनाने दिले होते. मात्र या रस्त्यांची कुठल्याहीप्रकारे दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे १० फेब्रुवारीपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही, तर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे कुठलेही वाहन फिरू देणार नाही. महामार्गाची तालुक्यात सुरू असलेली सर्व कामे बंद पाडण्यात येतील, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील-दांगोडे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
मागीलवर्षी जून व नोव्हेंबर महिन्यात भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे सचिव एकनाथ जाधव, जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, उद्योग आघाडीचे कैलास पवार, ज्ञानेश्वर जगताप यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यांनी वैजापूर शहरासह ग्रामीण भागात समृद्धी महामार्गाच्या कामामुळे रस्त्यांच्या होत असलेल्या दयनीय अवस्थेबाबत लक्ष वेधत सुमारे १५० किमी लांबीच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे रस्ते वाहतुकीसाठी योग्य नसल्याचे म्हटले होते. शिवाय रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. या सर्व रस्त्यांची कामे बांधकाम विभागाच्या मानांकनाप्रमाणे करण्याची मागणी केली होती.
तद्नंतर उपविभागीय अधिकारी यांनी भाजपचे पदाधिकारी व कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मागीलवर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करून दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. मात्र २०२१ मधील जानेवारी महिना संपत आला, तरीही कुठलीही कार्यवाही होत नसल्याने भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी समृद्धीचे कुठलेही वाहन फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. १० फेब्रुवारीपासून महामार्गाचे काम बंद करू, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत यांची स्वाक्षरी आहे.
या रस्त्यांची व्हावी दुरूस्ती
लासूरगाव ते शहाजतपूर, लासूरगाव ते अमानतपूरवाडी, लासूरगाव ते धोंदलगाव, औरंगाबाद-वैजापूर रोड ते जळगाव, जळगाव फाटा ते धोंदलगाव, करंजगाव ते धोंदलगाव, करंजगाव ते परसोडा, दहेगाव शेड ते पालखेड रस्ता, शिवराई ते अगर सायगाव, शिवराई ते परसोडा, तिडी ते अगर सायगाव, तिडी ते सवंदगाव, चिंचडगाव ते सटाणा, घायगाव ते सटाणा, वैजापूर ते म्हस्की, वैजापूर ते खंडाळा, वैजापूर ते लाडगाव, वैजापूर ते डवाळा, बेलगाव ते सुराळा, जरुळ भायगाव बिलोणी ते वैजापूर.