---
औरंगाबाद : कोचिंग क्लासेस असोसिएशनने स्वतःची बनविलेली कोरोना नियमावली मनपापेक्षा उत्तम आहे. त्याचे पालन करतोय. आता नियम पाळूनही १६ फेब्रुवारीपासून पथके धाडी टाकून दंड वसुलीच्या नावाखाली खंडणी वसूल करताहेत, असा आरोप करत या कार्यवाहीबाबत मनपाने फेरविचार करावा, अशी मागणी कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग वाघ यांनी केली आहे.
लॉकडाऊननंतर मनपाने १५ फेब्रुवारीपासून क्लासेस सुरू करण्याची अधिकृत परवानगी दिली. त्यानंतर लगेच १६ फेब्रुवारीला कोचिंग क्लासेसवर कारवाई सुरू केली. याचा अर्थ केवळ आर्थिक वसुलीसाठीच क्लासेसला परवानगी दिली होती का? विभागीय आयुक्तांची भाषा रेड करण्याची आहे. पथकाकडूनच कोरोनाच्या नियमावलीचा भंग होतोय. एक वर्षापासून क्लासेसचे आर्थिक उत्पन्न शून्य टक्के आहे. तरी देखील मनपाकडून मनमानी पद्धतीने कारवाई केली जात आहे. याबाबत फेरविचार व्हावा. कारवाईमुळे विद्यार्थी, शिक्षकांसह पालक धास्तावले असून पैसेच लागत असतील तर कोरोनाच्या लढ्याला निधी देऊ पण कोचिंग क्लासेस टार्गेट करू नका. असे प्रा. प्रशांत बनसोडे म्हणाले.
जे कोचिंग क्लासेस काळजी घेत नसतील त्यांच्यावर कारवाईला विरोध नाही. मात्र, चुकीच्या पद्धतीने पथकांकडून कारवाईला विरोध असल्याचे प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे प्रास्ताविकात म्हणाले. पत्रकार परिषदेत संघटनेचे एस.जी. म्हस्के, ए. बी. पाटील, ए.डी. मनवर, आर.आर. इप्पर, डी. आर. माने, व्ही.जे. सोसे, पी.डी. शिंदे, बी.ए. नेहरकर, वंदना नेहरकर आदींची उपस्थिती होती.