औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ पैकी ५७९ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. यात महाविकास आघाडी आणि भाजपत दावेबाजी सुरू झाली आहे. शिवसेनेने ३६० ग्रामपंचायतींवर वर्चस्व केल्याचा दावा करीत जिल्ह्यात मुसंडी मारल्याचा जल्लोष सुरू केला आहे, तर भाजपने २३८० सदस्य जिल्ह्यात निवडून आल्याने आमची ताकद वाढल्याचा सूर आळविला आहे. काँग्रेसने जिल्ह्यात ५० टक्के ग्रामपंचायतींवर झेंडा फडकेल असे भाकीत केले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १८९ ग्रामपंचायतींवर पक्षाचे सदस्य सरपंच होतील, असा दावा केला आहे. या सगळ्या गर्दीत मनसेनेही ७७ सदस्य निवडून आल्याने आनंदोत्सव साजरा केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने एकूण ६१६ जागांपैकी ३६० ठिकाणी स्वबळावर बहुमत मिळविले आहे. ७२ ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बहुमत प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायतींवर भगवा फडकेल, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे, तर भाजप जिल्ह्यात सर्वांत जास्त सदस्य असलेला पक्ष म्हणून पहिल्या क्रमांकावर असल्याचे खा. डॉ. भागवत कराड यांनी म्हटले आहे.
शिवसेना ३६०, भाजप २०८, काँग्रेस ३००, राष्ट्रवादी काँग्रेस १८९ या राजकीय दाव्यांची गोळाबेरीज केली, तर १ हजार ५७ ग्रामपंचायती होतात. मुळात ६१७ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ३२ ठिकाणी ६१० सदस्य बिनविरोध निवडून आले. ६ ठिकाणी मतदान झाले नाही. ५७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान व मतमोजणी झाली. ११ हजार ४९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. साडेअकरा लाख मतदारांनी ४ हजारांच्या आसपास सदस्य निवडून दिले.
शिवसेनेचा दावा असा
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत २८७ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात होत्या. आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालानुसार शिवसेनेची संख्या ३६० वर गेली आहे, असे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात भाजपच आघाडीवर
२०८ ग्रामपंचायती भाजपच्या असतील. ४५ ठिकाणी संमिश्र कौल मिळाला आहे. भाजपचे २३८१ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे जिह्यातील ग्रामीण राजकारणात भाजपच आघाडीवर आहे, असा दावा जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी केला.
५० टक्के ठिकाणी काँग्रेस
जिल्ह्यातील ५० टक्के ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. चांगला प्रतिसाद राहिला आहे. उरलेल्या जागांवर महाविकास आघाडीचे यश असल्यामुळे भाजप बऱ्यापैकी संपुष्टात आला आहे, असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. कल्याण काळे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच होतील
१८९ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. त्या ठिकाणी सरपंचदेखील होतील. हे स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे यश आहे. महाविकास आघाडीचा विचार केला तर आणखी ५० जागा वाढतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
मनसेचा ग्रामीण राजकारणात प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामीण राजकारणात नव्या दमाने प्रवेश करीत ७७ सदस्य निवडून आणले आहेत, असा दावा जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांनी केला आहे. सहा तालुक्यांत मनसेचे सदस्य निवडून आले आहेत.