छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे काम केले होते. त्यांची निवडणुकीत मला मदत झाली असेल तर त्यांचे आभार मानतो. ते आमच्या शिवसेनेत येणार असतील तर त्यांच्यासाठी आमच्या पक्षाची दारे उघडी असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा शिवसेना प्रवक्ता संजय शिरसाठ यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत बाहेरील लोक आले आणि तिकीट मिळवून निवडणूक लढले. हरल्यानंतर ते परत जातील हे खैरे यांच्या तेव्हा लक्षात आले असेल. यातून त्यांनी आपल्याला मदत केली असू शकते. विरोधी पक्षनेते पदाचा अचानक लाभ झाल्यामुळे आ. दानवे यांना घमेंड आल्याची टिपणी मंत्री शिरसाट यांनी केली.
ईदनिमित्त माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे आ. दानवे यांचे जाणे ही त्यांच्या पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात उद्धवसेनेला एमआयएमसोबत लढावे लागणार आहे, हे पाहूनच ते ओवेसीला जवळ करीत आहेत. एवढेच नव्हे तर ओवेसी मातोश्रीवर जातील, असा उपरोधिक टोला शिरसाट यांनी उद्धवसेनेला लगावला. उद्धवसेनेच्या ताब्यात एकही ग्रामपंचायत, मनपा, नगरपालिका नाही. झीरो असलेल्या पक्षाची ही अवस्था कोणामुळे झाली, हे लक्षात आल्याने खैरे यांनी खदखद बोलून दाखविल्याचे शिरसाट म्हणाले.