फक्त १४ हजार रुग्णांनाच मोफत उपचार
जनआरोग्य योजना : पण कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्या ५३ हजार रुग्णांवर मोफत उपचार
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात १५ मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२१ या १३ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १ लाख २४ हजार २०७ कोरोना रुग्ण आढळले. मात्र, यापैकी अवघ्या ११.६१ टक्के म्हणजे १४ हजार ४३० रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार मिळाले. त्यातही सर्वाधिक रुग्णसंख्या ही घाटी रुग्णालयातीलच आहे. या उलट याच कालावधीत कोरोनापेक्षा इतर आजारांच्या तब्बल ५३ हजार ३७१ रुग्णांवर योजनेत मोफत उपचार झाले.
काेराेनाग्रस्तांच्या उपचारासाठी सरकारी यंत्रणेबराेबर खासगी रुग्णालयेही दिवसरात्र कष्ट घेत आहेत. कोरोनाविरुद्ध लढा देताना कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासकीय रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालयांतही मोफत उपचार केले जातील, असे जाहीर करण्यात आले. २३ मेपासून त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. परंतु या योजनेत उपचार मिळत नसल्याची परिस्थिती आकडेवारीवरून दिसते आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात १४ हजार ४३० कोरोना रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती योजनेच्या औरंगाबाद जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनावर खासगीत उपचार करण्यासाठी खिशाला कात्री बसत आहे. सध्या अनेक खासगी रुग्णालयांत उपचारापोटी रुग्णांच्या नातेवाइकांना हजारो रुपये मोजावे लागत आहे. काही ठिकाणी तर उपचाराचा खर्च लाखाच्या पुढे जात आहे. या योजनेविषयी अनेक अडचणी आहेत, त्यात अनेक बदल आवश्यक आहे. यासंदर्भात वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला माहिती कळविल्याचे रुग्णालयांतर्फे सांगण्यात आले.
-----
उसने घ्या, व्याजाने काढा; पण पैसे भरा
१. कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेकांना योजनेविषयी माहिती मिळतच नाही. ज्या रुग्णालयात दाखल होतात, ते योजनेतील अंगीकृत रुग्णालय नसते. त्यामुळे याेजनेसाठी पात्र असूनही अनेकांना लाभ मिळत नाही आणि उपचारापोटी हजारो रुपये भरावे लागतात.
२. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोविडवर उपचार घेताना लागणाऱ्या महागड्या औषधांचा खर्च समाविष्ट नाही. त्यामुळे औषधांपोटीही रुग्णांच्या नातेवाइकांना हजारो रुपये मोजावे लागतात.
३. आजाराची परिस्थिती अचानक उद्भवल्याने जवळ पैसा नसतो. अशावेळी उसने पैसे घेऊन, प्रसंगी व्याजाने पैसे काढून उपचार घेण्याची वेळ आल्याचे काहींनी सांगितले. ज्या ठिकाणी योजनेंतर्गत उपचार होतात, तेथे कोरोना रुग्णाला बेडच मिळाला नाही, असेही काहींनी सांगितले.
------
अशी करा नोंदणी
सर्व अंगीकृत रुग्णालयांत आरोग्य मित्र कार्यरत आहेत. आरोग्य मित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाइन नोंदणी करतात. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी रुग्णाचे ओळखपत्र पाहून केली जाते. रुग्ण नोंदणीसाठी शिधापत्रिका आणि ओळखपत्र असणे आवश्यक असते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेकांकडे कागदपत्रे उपलब्ध नसतात. परंतु त्यासाठी अडून न बसता इमर्जन्सी टेलिफोनिक इंफॉर्मेशनयंत्रणेद्वारे योजनेचा लाभ घेता येतो.
--
विविध रकमेचे पॅकेज
कोविड रुग्णांसाठी २० श्वसनसंस्थांचे आणि आयसीयू उपचार योजनेंतर्गत घेता येतात. १५ हजार ते ८५ हजारांपर्यंतच्या रकमेचे पॅकेज योजनेत उपलब्ध आहेत. कोरोना रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि त्याची ऑक्सिजन पातळी ९४ टक्केच्या खाली असेल आणि त्यास बाहेरून ऑक्सिजन देण्याची गरज भासत असेल तर २० हजार रुपयांच्या पॅकेजमध्ये उपचार घेता येतात. रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज असेल तर इतर पॅकेज घेता येतात.
--
...तर करा तक्रार
अंगीकृत रुग्णालयाकडून योजनेंतर्गत उपचार दिले जात नसतील तर त्यासंदर्भात रुग्णालयातील योजनेच्या आरोग्य मित्राकडे तक्रार करता येते. एखादा रुग्ण ऑक्सिजनवर असेल, आरटीपीसीआर पाॅझिटिव्ह अहवाल आला असेल तर कमीत कमी २० हजार रुपयांचे पॅकेज घेता येते, असे महात्मा जोतिबा फुले जनआराेग्य याेजनेचे जिल्हा समन्वयक डाॅ. मिलिंद जाेशी यांनी सांगितले. आरोग्य मित्रासह जिल्हा प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडेही तक्रार करता येते.
-------
योजनेशी जोडलेली जिल्ह्यातील रुग्णालये-४१
एकूण कोरोनाबाधित-१,३८,०३५
एकूण कोरोनामुक्त-१,२८,७४३
आतापर्यंत झालेले मृत्यू-२९६६
सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण-६,३२६
योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण-१४, ४३०