लातूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१४-१५ मध्ये नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत लातूर शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी २ कोटी ३४ लाख ४७ हजार रूपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती़ त्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा कांगावा करणाऱ्या मनपाच्या कारभाऱ्यांनी अद्याप ते काम केले नसल्याने दुष्काळ सदृश परिस्थीती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील निधी गाळ काढण्यासाठी वाहन खरेदीसाठी वळती करण्याचे प्रस्तावित केले आहे़लातूर महापालिकेच्या कारभारी एकीकडे निधी नसल्याची ओरड करीत नागरिकांची दिशाभूल करीत आहेत, तर दुसरीकडे तिजोरीत पडून असलेला निधी खर्चास त्यांना वेळ मिळत नसल्याने तिजोरीतील कोट्यवधींची रक्कम मार्चअखेर परत जाण्याच्या मार्गावर आहे़ शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी डीपीडीसीने नाविण्यपूर्ण योजनेतून २ कोटी ३४ लाख ४७ हजार रूपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती़ त्यानुसार ३१ मार्च २०१५ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत योजना पूर्णत्वास नेण्याचे आदेश असतानाही कारभाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मनपाची ‘निष्क्रीयता’ समोर आली आहे़ कोट्यवधी रूपये तिजोरीत पडलेले असताना त्याचा विनियोग लावण्यासाठी ‘जाणीवपूर्वक’ वरिष्ठांकडून चालढकल केली जात असल्याची कुजबुज मनपात आहे़ एकवेळा निविदा काढली़ त्यात त्रुटी आल्याने विधानसभा निवडणुकीनंतर फेरनिविदा काढण्यात आली ती पुन्हा अद्यापही उघडण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ ३१ मार्चची डेडलाईऩ़़सीसीटीव्हीचे काम पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१५ ची डेडलाईन मनपाला होती़ २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले़ पाणीटंचाई व दुष्काळसदृश्य परिस्थिती विचारात घेता लातूर जिल्ह्यातील तलावातील गाळ काढण्यासाठी वाहने खरेदी करणे योजनेस प्रथम प्राधान्य देवून जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने सदरचा निधी या योजनेवर वळती करण्याचे प्रस्तावित केले आहे़ याप्रकरणी लवकरात लवकर आपला अभिप्राय जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात दिल्या होत्या़ मनपा प्रशासनाने अद्याप आपला अभिप्रायही कळविला नाही़ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना प्रशासन किती गंभीरपणे काम करते याचे हे उत्तम उदाहरण आहे़ निधी तात्काळ खर्च करावा, अशी मागणी रिपाइचे चंद्रकांत चिकटे यांनी केली आहे़ (प्रतिनिधी)
मनपाला दिलेले सीसीटीव्हीचे २ कोटी ३४ लाख परतीच्या मार्गावर
By admin | Published: February 17, 2015 12:16 AM