छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूसाठी नेमलेल्या शोध समितीने १०० अर्जांपैकी केवळ २४ जणांनाच २९ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आयआयटी पवई येथे होणाऱ्या मुलाखतीसाठी पाचारण केले आहे. त्यात विद्यापीठातील परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी आणि पर्यावरणशास्त्राचे डॉ. सतीश पाटील या दोघांचा समावेश आहे.
विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी कुलगुरू शोध समिती माजी शास्त्रज्ञ डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली. या समितीत भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.जी. सुरेश, एनआयटी श्रीनगरचे संचालक डॉ. सुधाकर एडला यांची सदस्य तर सदस्य सचिव म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आहेत. नोडल अधिकारी म्हणून एनआयडी श्रीनगर येथील प्राध्यापक डॉ. जानिबुल बशीर काम पाहत आहे. या समितीने २० सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान पात्रताधारकांकडून अर्ज मागविले होते. त्यात १०० जणांनी अर्ज केले. २६ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात केवळ २४ नावांवर मुलाखतीसाठी शिक्कामोर्तब केले. या नावांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली.
या २४ जणांमधून होणार कुलगुरूकुलगुरू शोध समितीने २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुलाखतीसाठी डॉ. हरेंद्र सिंग, प्रा. विलास खरात, प्रा. सतीश शर्मा, प्रा. राजीव गुप्ता, प्रा. सुभाष कोंडवार, डॉ. एस.के. सिंग, डॉ. गणेशचंद्र शिंदे, डॉ. विजय फुलारी, प्रा. संजय चव्हाण, प्रा. राजेंद्र काकडे, डॉ. भारती गवळी, प्रा. इंद्राप्रसाद त्रिपाठी, डॉ. अनिल चंदेवार, प्रा. ज्योती जाधव, डॉ. दत्तात्रय गायकवाड, प्रा. मनोहर चास्कर, प्रा. राजेंद्र सोनकवडे, प्रा. उदय अन्नापुरे, प्रा. अशोक महाजन, प्रा. संदेश जाडकर, प्रा. राजू गच्चे, डॉ. संजय ढोले, डॉ. सतीश पाटील आणि प्रा. प्रमोद महुलीकर यांना बोलावले.
अनेकांचे अर्ज, बोलावले दोघांनाचविद्यापीठातील विविध विभागांसह संलग्न महाविद्यालयातील अनेकांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केले होते. मात्र, त्यातील केवळ परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी व डॉ. सतीश पाटील यांना मुलाखतीसाठी बोलावले आहे.