आडूळ ( औरंगाबाद ) : जोरदार पावसाने घरा कोसळून आजोबा आणि नातीचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान पैठण तालुक्यातील घारेगाव येथे घडली. जगदिश विठ्ठल थोरे ( ६० ) व वेदिका ज्ञानेश्वर थोरे ( १३ ) अशी मृतांची नावे आहेत. यावेळी घरातील इतर तिघे थोडक्यात बचावले आहेत.
घारेगाव येथे शुक्रवारी रात्री तब्बल तीन - चार तास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे थोरे यांच्या घरावरील लाकडी छत ( माळवद) खचले. पहाटे १ वाजेच्या दरम्यान गाढ झोपेत असणाऱ्या घरातील पाच सदस्यांच्या अंगावर छत कोसळले. यावेळी मोठा आवाज झाल्याने शेजारी तात्काळ धावून आले. त्यांनी एका जेसीबी चालकांस संपर्क करून ढिगाऱ्या खाली दबलेल्या पाचही जणांना बाहेर काढले. एका खाजगी वाहनाद्वारे तातडीने आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केद्रांत उपचारासाठी दाखल केले. जगदिश थोरे व वेदिका थोरे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर इतर तिघांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केद्रांत डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने जगदिश थोरे व वेदिका थोरे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दुर्दैवी घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जगदिश थोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा-सुन असा परिवार आहे. पाचोड पोलिस ठाण्यातील पो उपनिरीक्षक सुरेश माळी,बिट जमादार जगन्नाथ उबाळे,हनुमान धनवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.