औरंगाबाद : हृदयाला साद घालणारी हळूवार गीते आणि सोबत गायक दाम्पत्याचा सांगितीक प्रवास अशा स्वरूपाचा कार्यक्रम रसिकांची दाद मिळवून गेला. सुप्रसिद्ध संगीतकार विश्वजित जोशी आणि गायिका मैथिली जोशी यांनी सुरेल गाणी सादर केलीच पण रसिकांशी मनमुक्त संवादही साधला.
शनिवारी सायंकाळी एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मैथिली यांनी ‘ज्योती कलश झलके...’ या गीताने मैफलीची सुरूवात केली. आवाजातील मार्दव आणि सहजगत्या निघणाऱ्या हरकती उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेल्या. यानंतर ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या..’, ‘लग जा गले...’, ‘सुंदर ते ध्यान..’ अशा रसिकांच्या आठवणींशी जोडली गेलेली गीते सादर झाली आणि ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
विश्वजीत जोशी यांनी त्यांची तसेच मैथिली यांची सांगितीक कारकिर्द, आतापर्यंतचा अनुभव याविषयी उपस्थितांशी संवाद साधून उपस्थित विद्यार्थ्यांना पार्श्वसंगीताविषयी मार्गदर्शन केले.