औरंगाबाद : महावितरणच्या ग्रामीण अधीक्षक अभियंत्याविरोधात याच कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान ग्रामीण अधीक्षक प्रवीण मारोतीराव दरोली यांच्या कार्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांचे वरिष्ठ अधिकारी हे अधीक्षक अभियंता आहेत. जानेवारी २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान दरोली हे त्यांना कार्यालयीन कामानिमित्त त्यांच्या कक्षात बोलवत. त्यावेळी त्यांच्या टेबलवर महिलेची नजर पडेल असे पेपरवेटच्या आकाराची स्टीलच्या महिलेची नग्न (कोरीव) प्रतिमा टेबलावर ठेवत. त्या प्रतिमेकडे लक्ष जावे या उद्देशाने ते त्या प्रतिमेला हाताने फिरवत. सातत्याने हे घडत असल्याने अखेर पिडीत महिलेने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.