पैठण: मोहरम मिरवणुकीत मिरवले जाणारे ऐतिहासिक प्राचीन पितळी पंजे चोरीस गेल्याची घटना मंगळवारी पैठण शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून. गेल्या चारशे वर्षांपासून मोहरम सणाला सवारी मिरवणुकीत श्रध्देने सदर पंजे मिरवले जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पैठण शहरात हताई भागातील एका घरात ठेवण्यात आलेले पितळी पंजे चोरीस गेल्याचे म़गळवारी समोर आले. या पंजाची किंमत दीड लाखाच्या आसपास असल्याची मुस्लिम बांधवात चर्चा आहे. या बाबत पैठण पोलिस ठाण्यात ताहेर अली यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक प्रकाश वानोळे, सादिक धांडे, खलील धांडे,संजय कस्तुरे, संजय साळुंके, जमील शेख, अफरोज वड्डे, अब्दुल शेख, लाला धांडे आदीनी घटनास्थळी धाव घेतली.
मोहरमचे पितळी पंजे ऐतिहासिक असून मोहरमच्या मिरवणुकीत सवारी मध्ये यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे, या पंजाचे हिंदू -मुस्लिम मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत. ऐतिहासिक धार्मिक पंजे चोरीस गेल्यामुळे हिंदू मुस्लिम नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली.