कन्नड शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेले कळंकी गाव दुर्गम आदिवासी डोंगराळ भागात वसलेले आहे. २०११च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १ हजार ६१९ आहे. गावात ठाकर आदिवासींची वाडी असून, गावाला धार्मिक, सामाजिक व पर्यटन स्थळ म्हणून महत्व आहे. गावात दक्षिणमुखी जागृत हनुमान मंदिर असून, हनुमानाच्या दर्शनाने गालफुगी झालेल्या रुग्णांना येथे आराम पडतो, अशी नागरिकांची धारणा आहे. परंतु गावात कोणतेही मोबाईल नेटवर्क नसल्याने इतरांशी संपर्क तुटलेला आहे. यामुळे शासकीय योजनांच्या ऑनलाईन लाभापासून नागरिकांना वंचित राहावे लागते. मोबाईलचे युग असल्याने जग खूप जवळ आले आहे. मात्र, या गावात मोबाईलवर संपर्क साधणेही दुरापास्त आहे. येथून कुणाला फोन लावायचाच असेल तर घराच्या धाब्यावर जावे लागते.
कोरोनामुळे शाळा बंदच होत्या. मात्र, ऑनलाईन शिक्षण सुरू होते तथापि गावात नेटवर्क नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. गावात रेशन आले तर ई पॉस मशिनवर अंगठ्याचे ठसे जुळल्याशिवाय रेशन मिळत नाही. त्यामुळे ठसे जुळविण्यासाठी उंच टेकडीवर ई पॉस मशीन घेऊन ठसे जुळविण्याचे काम केले जाते. शासनाने कोणत्याही लाभाच्या योजनेसाठी ऑनलाईनवर भर दिला आहे. मात्र, या गावात नेटवर्कच नसल्याने बाहेरगावी जाऊन कामे ऑनलाईन करावी लागतात. तीन वर्षांपूर्वी येथे बीएसएनएल व एका खासगी कंपनीने दोन मनोरे उभारले. परंतु वेळोवेळी मागणी करूनही मनोरे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे हे मनोरे गावासाठी फक्त शो म्हणून आहेत. राजकीय पुढाऱ्यांनी केवळ पोकळ आश्वासन देऊन बोळवण केली आहे.
---------- मनोऱ्यासाठी बहिष्कार -------
मोबाईलचे मनोरे सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी गावात बैठक घेऊन एक महिन्यात मोबाईल टॉवर सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला होता. परंतु मनोरे अद्याप सुरू झाले नसल्याचे अरूण थोरात यांनी सांगितले.
300721\img-20210730-wa0037.jpg
बीएसएनएलचा मनोरा