लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने आता गती घेतली आहे. आतापर्यंत जवळपास दीडशे शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून जिल्हा परिषदेत हजर झाले, तर येथून २८० शिक्षक कार्यमुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेने जेवढे शिक्षक सोडले, तेवढेच शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून येणार आहेत. त्या सर्वांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिल्या जाणार आहेत. मंगळवारी जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. आंतरजिल्हा बदलीने मागील ८ ते १० दिवसांपासून १४० शिक्षक जिल्हा परिषदेत दाखल झाले आहेत. शिक्षण विभागाने त्यांना रुजू करून घेतले असले, तरी अद्याप कोणालाही पदस्थापना दिलेली नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पहिल्यांदा आदिवासी किंवा नक्षलग्रस्त क्षेत्रातील शाळांमध्ये पदस्थापना द्यावी. सेवाज्येष्ठ शिक्षक अशा क्षेत्रात जाण्यास तयार नसतील, तर सेवाकनिष्ठ शिक्षकांना त्याठिकाणच्या शाळांमध्ये पदस्थापना द्यावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. पण, औरंगाबाद जिल्ह्यात ही दोन्ही प्र्रकारची क्षेत्रे नाहीत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी समुपदेशन पद्धतीनुसार पदस्थापना देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांपैकी पहिल्यांदा सेवाज्येष्ठ शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये पदस्थापना देण्याविषयी विचारले जाणार आहे. ते तयार नसतील, तर सेवाकनिष्ठ शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नोकरी करावी लागणार आहे. त्यांना त्या ठिकाणच्या शाळांमध्ये समुपदेशन पद्धतीद्वारे पदस्थापना दिली जाणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना आता पदस्थापनेची प्रतीक्षा आहे. जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया जुलैअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष संवर्ग भाग-१ मध्ये येणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत काल शुक्रवारी दुपारी ४ वाजेपासून संपुष्टात आली. शासनाने एका परिपत्रकाद्वारे विशेष संवर्ग भाग- २ मध्ये समाविष्ट शिक्षकांसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत १४ ते १७ जुलैदरम्यान आहे. शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन अर्ज भरता येईल. दरम्यान, एकदाच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षकांकडून आॅनलाइन अर्ज भरण्याचा भार सर्व्हरवर पडल्यास ते हँग होईल. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १४ ते १७ जुलैदरम्यान बीड, लातूर, जालना, सोलापूर आणि परभणी या पाच जिल्ह्यांसाठी सर्व्हर खुले करून दिले जाणार आहे.
बाहेरून तेवढेच शिक्षक येणार
By admin | Published: July 16, 2017 12:29 AM