लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीय आरोग्य समिती ३ ते ११ नोव्हेंबर दरम्यान परभणीच्या दौºयावर येत असल्याने एकीकडे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात रंगरंगोटी केली जात असून, या माध्यमातून सर्व काही अलबेल असल्याचा दिखावा केला जात आहे़ तर दुसरीकडे रुग्णालयातील विविध वार्डमध्ये मात्र अस्वच्छतेची दुर्र्गंधी कायम असून, अनेक औषधींचा तुटवडा असल्याने रुग्णांना खाजगी दुकानातून या औषधी आणाव्या लागत असल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे़राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दर्जेदार आरोग्य सेवा रुग्णांना मिळावी, या उद्देशाने जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून दिला जातो़ दिलेल्या निधीचा सदउपयोग होतो की नाही? याची पडताळणी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य समिती ३ ते ११ नोव्हेंबर असे तब्बल आठवडाभर जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे़ ही समिती जननी सुरक्षा योजना, जननी शिशू कार्यक्रम, कुटूंब कल्याण, बालकांचे लसीकरण, गरोदर मातांची तपासणी, संसर्गजन्य आजार, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, रुग्णालयातील स्वच्छता आदी बाबींसह आर्थिक व्यवहारांचीही तपासणी करणार आहे़त्या अनुषंगाने सध्या जिल्हा रुग्णालय व परिसरात रंगरंगोटी करून चकाकी दाखविण्याचा खटाटोप रुग्णालय प्रशासनाकडून सुरू आहे़ या अनुषंगाने बुधवारी दुपारी १२़३० च्या सुमारास जिल्हा रुग्णालय परिसराची पाहणी केली असता, गंभीर परिस्थिती समोर आली़ जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून खोकल्याची औषधी उपलब्ध नाही़ सहा महिन्यांपासून अँटीबायोटिक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा आहे़सर्दी, ताप आदी आजारांसाठीच्या सर्वसाधारण औषधी देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत़ अशक्त रुग्णांना लावण्यासाठी आवश्यक असलेले सलाईन देखील येथे उपलब्ध नाही़ त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना हे सर्व साहित्य जिल्हा रुग्णालयाच्या समोरील खाजगी औषधी दुकानांमधून खरेदी करावे लागत आहे़विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयात खाजगी दुकानांमधून औषधी आणण्यास मनाई असताना येथील काही वैद्यकीय अधिकारीच खाजगी औषधी आणण्यास सांगत आहेत़ रुग्णालयात अनेक महिन्यांपासून औषधींचा तुटवडा असताना ती औषधी उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून तातडीने कारवाई होत नाही़ परिणामी नाईलाजाने रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी दुकानांतून औषधी आणाव्या लागत असल्याची माहिती खुद्द रुग्णांच्या नातेवाईकांनी बुधवारी दिली़रुग्णालयातील पुरुष वार्डला भेट दिली असता वार्डच्या दरवाज्यापासूनच अस्वच्छता पहावयास मिळते़ वार्डचे दरवाजेच गुटखा व पानाच्या पिचकाºयांनी रंगलेले दिसून आले़ या वार्डमध्ये स्वच्छता नसल्याने दुर्गंधी पसरल्याचे पहावयास मिळाले़ वार्डमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्याजवळील साहित्य ठेवण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही़ परंतु, राष्ट्रीय स्तरावरील समिती तपासणीसाठी येणार असल्याने स्थानिक प्रशासनाने चक्क रुग्णांना साहित्य ठेवण्यासाठी नवीन टेबल खरेदी करून प्रवेशद्वारातच ठेवल्याचे पहावयास मिळाले़ याशिवाय रुग्णांच्या खाटांकरीता नवीन बेडसिट, उषांचे कव्हर आदी साहित्यही खरेदी करण्यात आल्याचे पहावयास मिळाले़ पुरुष वार्डानंतर स्त्री रुग्णालयास भेट दिली असता, येथेही स्वच्छतेचा अभाव असल्याने दुर्गंधी पहावयास मिळाले. येथे एका बेडवर २-२ महिला उपचार घेत असल्याचे दिसून आले़जळीत कक्षातही स्वच्छता दिसून आली नाही़ त्यामुळे आरोग्य सेवेच्या ज्या मूळ बाबींकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे होते, त्याकडे लक्ष न देता रुग्णालयाबाहेरील भिंतींना रंग देण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे पहावयास मिळाले़ याशिवाय मुख्य रस्त्यावर जिल्हा रुग्णालयाच्या नावाचा नवीन बोर्ड बसविण्यात आला़स्त्री रुग्णालयाच्या समोर हायमास्टचे खांब बसविण्यात आले़ यासमोरील वाळलेले झाड बुधवारी तोडण्यात आले़ जुन्या प्रशासकीय इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली तर नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये औषधी भांडार हलविण्याचे काम सुरू असल्याचे बुधवारी पहावयास मिळाले़
बाहेरून दिखावा; आतून बंडाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:31 AM