औरंगाबाद : कोरोनापाठोपाठ सध्या ‘म्युकरमायकोसिस’च्या नावाची धडकी भरत आहे. परंतु वेळीच औषधोपचार घेतले तर या आजारावरही मात करणे शक्य आहे. घाटी रुग्णालयातून आतापर्यंत ११ रुग्ण या आजारावर यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहे.
बुरशीजन्य (फंगल इन्फेक्शन) जंतूमुळे हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले. घाटीत दाखल रुग्णांच्या संख्येत रोज भर पडत असून, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६२ झाली आहे. तर आतापर्यंत ११ रुग्ण उपचार घेऊन परतले आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. सुनील देशमुख, डाॅ. वसंत पवार, डाॅ. महेंद्र कटरे, डाॅ. शैलेश निकम, डाॅ. सोनाली लांडगे आदींसह परिचारिका, आरोग्य कर्मचार्यांनी परिश्रम घेेतले. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डाॅ. येळीकर यांनी सांगितले.
चौकट...
खासगीतील रुग्णांसाठी नातेवाईकांची धावपळ
म्युकरमायकोसिसच्या एका रुग्णाला रोज तीन यानुसार १४ दिवसांत ४२ इंजेक्शन द्यावे लागतात. जिल्ह्याला आतापर्यंत २८० इंजेक्शन मिळाली. रुग्णसंख्येच्या तुलनेत इंजेक्शन अपुरी पडत आहेत. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. रुग्णालयाने जिल्हा प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर इंजेक्शन मिळते. परंतु पुरवठा कमी असल्यानेे नातेवाईकच इंजेक्शनची शोधाशोध करीत आहेत.
---
रुग्णांनी खबरदारी घ्यावी
कोरोना झालेल्या रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे. स्वच्छ मास्कचा वापर करावा. धुळीत जाण्याचे टाळावे. मधुमेह नियंत्रणात ठेवावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ३ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. या तिघांवरही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
-डाॅ. वसंत पवार, कान-नाक-घसा विभाग, घाटी