- राम शिनगारे
औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या परिसरात असलेल्या मुलानी वाडगाव गावातील जि.प. प्राथमिक शाळा प्रयोगशील शाळा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या शाळेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा यशस्वी प्रयोग शिक्षकांनी राबविला आहे. या प्रयोगाला यश मिळाल्यामुळे गावकरीही शाळेला आवश्यक ती मदत करीत असल्याची माहिती शाळेतील शिक्षिका सारिका बद्दे यांनी दिली.
पैठण तालुक्यात मुलानी वाडगाव हे छोटेखानी पुनर्वसित गाव आहे. या गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आदर्श म्हणून नावारूपाला आली आहे. शाळेचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. संरक्षक भिंत असून, प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टरचे पाणी ग्रामपंचायतीने उपलब्ध केले आहे. या शाळेतील सर्वच शिक्षक २०१८ मध्ये रुजू झालेले आहेत. त्यांना शाळेतील मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘माझे सूर्योदयी उपक्रम’ नावाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. यात विद्यार्थ्यांकडून परिपाठ घेतला जातो. यातून मुले बोलकी झाली. त्यांचा आत्मविश्वास दुणावला. श्रावण महिन्यात विविध उत्सावांचे देखावे तयार करण्यासाठी ‘श्रावण मासी, हर्ष मानसी’ हा उपक्रम राबविला. यात विद्यार्थ्यांनी देखावे तयार केले. महापुरुषांच्या जयंत्या, स्मृतिदिन विविध माध्यमांतून साजरे केले जातात.
जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात गावातील महिलांना सहभागी करून घेतले जाते. शाळेतील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘माझे शिकण्याचे प्रयोग.’ या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यात येते. त्याचवेळी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी भेटीसाठी नेण्यात येते. त्याठिकाणी विद्यार्थी मुलाखती घेतात. सादरीकरण करतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचेही शिक्षक सारिका बद्दे सांगतात. या प्रकारच्या अध्ययनामुळे विद्यार्थी आनंदाने त्यात सहभागी होत असल्याचा प्रत्ययही येत आहे.
‘माझे प्रेरणादायी आदर्श’ याद्वारे वैज्ञानिक आणि थोर तत्त्ववेत्ते यांचा परिचय करून दिला जातो. त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित गोष्टी सांगितल्या जातात. यासाठी यू ट्यूब, गुगल, बोलो अॅप याचाही वापर केला जातो. याशिवाय शाळेत सहल, क्षेत्रभेटीसह वाचन प्रेरणा, आंतरराष्ट्रीय विज्ञान, मराठी राजभाषा, संविधान, बाल, स्वयंशासन, बालिका दिन मोठ्या उत्साहात आणि नावीन्यपूर्णरीत्या साजरे केले जातात. यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास केला जात आहे. या उपक्रमांचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी कौतुकही केले आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक सुभाष जगदाळे, शिक्षक बाळासाहेब कोपले, राजाभाऊ चव्हाण, सारिका बद्दे, अनुराधा उसरे, शुभांगी गुठे, स्वाती पाटील हे परिश्रम घेत आहेत.
डिजिटल बनविण्याचा ध्यासशाळेमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षक नावीन्यपूर्ण अध्यापन करीत आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक तंत्रस्नेही बनविण्यासाठी शाळा डिजिटल करण्याचा ध्यास सर्वच शिक्षकांनी घेतला आहे. त्यासाठी गावकरीही मदत करण्यास तयार आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात हा प्रकल्पही मार्गी लागेल, असा विश्वास शिक्षक व्यक्त करतात. शाळेला सिजेंटा फार्मा कंपनीने संगणक प्रोजेक्ट्रर आणि प्रिंटर दिले आहे. इतरही कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शाळेतील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा प्रयत्न शिक्षक करीत आहेत.
शाळेची माहितीगाव : मुलानी वाडगाववर्ग : पहिली ते पाचवीविद्यार्थी संख्या : १७०शिक्षक संख्या : एक मुख्याध्यापक, सहा शिक्षक