कन्नड - अंबाडी धरणाचे पाणी शेती सिंचनासाठी तात्काळ सोडावे या मागणीसाठी धरणाच्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात गुरुवारी दुपारपासुन ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत कालव्याच्या शेवटच्या टोकाच्या लाभार्थ्याला पाणी जाणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. थंडी असल्याने शेकोटीही पेटविण्यात आली होती.
सोलापुर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अंबाडी धरणाच्या उजव्या कालव्याचे नुकसान झाले आहे. शेतीसाठी पाणी मिळेल व पेरणी केलेली पिके वाचतील या आशेपोटी पदरचा खर्च करुन शेतकऱ्यांनी नासाडी झालेल्या कालव्याची दुरुस्ती केली. वारंवार पाठलाग करूनही पाणी मिळत नसल्याने ठिय्या आंदोलनाचा मार्ग पत्करल्याचे आंदोलकांनी सांगितले. कालव्याच्या कामासाठी आलेले शासकीय पोकलेन पंधरा दिवसांपासून डिझेल नसल्याने उभे आहे. नियमानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांना पाण्याची दोन आवर्तने मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाहीत. शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपु लागली आहेत. पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेतले आहेत. मात्र, पाणी सोडण्यात आले नाही असे सचिन पवार यांनी सांगीतले. आंदोलनात जगदीश जाधव,अशोक मुठ्ठे,सुशिल मोरे,कैलास ज़ाधव,दिनेश जाधव,श्रीहरी दापके,प्रविण जाधव,कडूबा जित्ते,दामु जाधव,बाळू जाधव,रमेश सिरसाट,प्रल्हाद सिरसाट,शिवनाथ दापके,बाळू गपक,बाळू शिंदे,आप्पासाहेब साबळे,संदीप वाघ यांच्यासह लाभक्षेत्रातील शिवराई,बहिरगाव,भोकनगाव,डोनगाव,विठ्ठलपुर येथील शेतकरी सहभागी आहेत. पाणी सोडले; मातीकामामुळे येण्यास वेळ लागले पाणी सोडलेले आहे पण नविन मातीकाम असल्याने पाण्याचा जिरण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी जाण्यास वेळ लागत आहे.जास्त दाबाने पाणी सोडल्यास कालवा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नुकसान झालेल्या कालव्याचे अंदाजपत्रक पाठविण्यात आलेले आहे असे शाखा अभियंता जारवाल यांनी सांगितले.