संतोष हिरेमठ
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येपुढे आता ऑक्सिजनही अपुरा पडत आहे. कारण दिवसेंदिवस ऑक्सिजनची मागणी वाढतच आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा सध्या पुरेसा आहे. परंतु, वाढत्या रुग्णसंख्येपुढे असलेल्या साठाही रिकामा होत आहे तर काेव्हॅक्सिन लसीचाही मागणीच्या तुलनेत पुरेसा पुरवठा होत नाही. सध्या ‘रेमडेसिविर’ पुरेशा प्रमाणात असले तरी जिल्ह्यात ऑक्सिजन आणि लसी वेटिंगवर असल्याची परिस्थिती आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवघ्या दोन महिन्यात ऑक्सिजनची रोजची मागणी ८ टनांवरून ६० टनांवर गेली आहे. आता वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने सध्याच्या साठा रिकामा होण्यापूर्वीच ऑक्सिजन मागविण्याची वेळ रुग्णालयांवर ओढावत आहे. त्यातही ऑक्सिजन सिलिंडर अपुरे पडत असल्याने नवीन सिलिंडर खरेदी करण्याचीही वेळ ओढावत आहे. तरीही वेळेवर सिलिंडर मिळत नाही. त्यातून जिल्हा रुग्णालयात जम्बो सिलिंडर संपल्यामुळे छोट्या सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्याची वेळ ओढावल्याचीही घटना घडली. औरंगाबादसाठी गुरुवारी २ हजार ७५० काेव्हॅक्सिन डोस मिळाले. परंतु, हा साठा तीन ते चार दिवस पुरेल इतकाच आहे.
---------
ऑक्सिजन : ६० टनाची मागणी, सिलिंडर अपुरे
औरंगाबाद जिल्ह्याला आजघडीला रोज ६० टन ऑक्सिजन लागत आहे. ६ मार्च रोजी रोज १५ टन ऑक्सिजन लागत होता. परंतु, अवघ्या काही दिवसात ४५ टनने मागणी वाढली. या मागणीत राेजच वाढ होत आहे. या सगळ्यात लिक्विड ऑक्सिजन मिळत आहे. परंतु, ऑक्सिजन सिलिंडरच्या तुटवड्याला सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.
पुढे काय : कोरोना रुग्ण वाढतच राहिले तर ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यात यंत्रणा लागली आहे.
-----
रेमडेसिविर : साठा पुरेसा, आणखी इंजेक्शनची यंत्रणेकडून मागणी
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुरेसा आहे. घाटीत महिनाभर पुरेल एवढा साठा असल्याचे सांगण्यात आले. रोज ३०० ते ३५० रुग्णांना इंजेक्शन दिले जात आहे. ३० एप्रिलपर्यंत आणखी इंजेक्शन मिळण्याची शक्यता आहे. तर मनपा आणि जिल्हा रुग्णालयातही मुबलक साठा असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा रुग्णालयासाठी साडेचार हजार इंजेक्शनची ऑर्डरही देण्यात आली आहे.
पुढे काय : महिनाभर इंजेक्शन पुरतील. परंतु त्यानंतर नवा साठा न मिळाल्यास आणि रुग्ण वाढल्यास इंजेक्शनसाठी भटकंती करण्याची वेळ नातेवाईकांवर ओढावू शकते.
-------
लसीकरण : कोविशिल्ड लस देण्याची व घेण्याची सक्तीच
जिल्ह्याला आतापर्यंत २२ हजार ५०० काेव्हॅक्सिन लसी मिळाल्या होत्या. परंतु, नंतर या लसींचा पुरवठाच विस्कळीत झाला. गुरुवारी तीन ते चार दिवसांचाच साठा मिळाला. त्यामुळे या लसी घेतलेल्या लोकांना दुसरा डोस मिळावा, यासाठी नव्या लोकांना ही लस देणे बंद करण्यात आले. कोविशिल्ड लसीचा पुरेसा साठा असल्याने कर्मचाऱ्यांना, पहिला डोस घेणाऱ्यांना हीच लस देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे हीच लस घेण्याची सक्ती झाल्यासारखी स्थिती आहे.
पुढे काय : काेव्हॅक्सिनचा पुरेसा साठा मिळाला नाही तर दुसरा डोस लांबण्याची शक्यता आहे. पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांवर या लसीची प्रतीक्षा करण्याची वेळ ओढावू शकते.
-----
रुग्ण वाढले तर कमी पडेल
सध्या ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात आहेत. परंतु, भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर या दोन्ही गोष्टी कमी पडण्याची शक्यता आहे. लसींचाही सध्या पुरेसा साठा आहे. नागरिकांनी मास्क वापरण्यास प्राधान्य द्यावे, सोशल डिस्टन्सचे पालन करावे आणि वारंवार हात धुवावे. या त्रिसुत्रीचे पालन अधिक महत्त्वपूर्ण आहे.
- डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक