सोयगाव तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने ५० ऑक्सिजन बेडला मंजुरी देऊन त्यासाठी निधीचीही तरतूद केली होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून या यंत्रणेसाठी वैद्यकीय तज्ज्ञ येण्यास नकार देत असल्याचे कारण पुढे केले गेले. यामुळे ही योजना बारगळली आहे. मंजूर झालेली ही योजना जरंडी कोविड केंद्रासाठी कार्यान्वित करण्याचा कृती आराखडाही तयार करण्यात आला होता. मात्र, अचानक ती बारगळल्याने तालुक्यातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांना ऑक्सिजनसाठी पुन्हा १२५ कि.मी.चा प्रवास करून औरंगाबाद गाठावे लागणार आहे. जरंडी कोविड केंद्रातील पन्नास बेड ऑक्सिजनयुक्त करण्याची पूर्वतयारी हाती घेण्यात आली होती. मात्र, ऑक्सिजन यंत्रणा हाताळण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ येण्यास नकार देत असल्याने जरंडीची मंजूर यंत्रणा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनसाठी पुन्हा औरंगाबादला घाटीचा रस्ता दाखविण्यात आला असून, त्यामुळे आता सोयगाव तालुक्यातील कोविड रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिविरसाठी औरंगाबादला जावे लागणार आहे.
चौकट
जरंडीची मंजूर यंत्रणा वाळूजला कार्यान्वित?
जरंडी कोविड केंद्रासाठी मंजूर करण्यात आलेली ५० बेडची मध्यवर्ती ऑक्सिजन यंत्रणा वाळूजला कार्यान्वित केल्याची चर्चा आहे. मात्र, याला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. जर असे झाले असेल, तर सोयगावसाठी तज्ज्ञ मिळाला नाही, तो वाळूजसाठी कसा मिळाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे काहीतरी साटेलोटे असल्याची चर्चा सोयगावात होत आहे.