संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रकोपाने औरंगाबाद जिल्हा ‘ऑक्सिजन’वर आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रोज तब्बल ६० टन ऑक्सिजन लागत आहेत. गतवर्षी एप्रिल २०२०मध्ये संपूर्ण महिनाभरात १३९.९६ टन ऑक्सिजन लागला होता. पण सध्या एवढा ऑक्सिजन जवळपास दोन दिवसातच संपत आहे. रोज मागणी वाढतच असल्याने पुढील काही दिवसात ऑक्सिजनची स्थिती चिंताजनक होण्याची भीती व्यक्त होत आहे.
औरंगाबादेत गेल्या दीड महिन्यातच ५० हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. रोज एक हजारांवर रुग्णांचे निदान होत आहे. त्यात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील २,१५८ ऑक्सिजन खाटा रुग्णांनी भरल्याची स्थिती आहे. २६२ व्हेंटिलेटरही अपुरे पडत आहेत. त्याचबरोबर २,८७४ रुग्ण गृह अलगीकरणात असून, यातील अनेक रुग्णही ऑक्सिजनवर आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.
गतवर्षी कोरोना रुग्णांची आणि उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या मर्यादित होती. आता रुग्णसंख्या आणि रुग्णालये दोन्हींची संख्या वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. रुग्णालयांतील टँक रिकामे होऊन रुग्णांचा जीव धोक्यात जाण्याचे टाळण्यासाठी लिक्विड ऑक्सिजनची मागणी आधीच करून ठेवावी लागत आहे. ऑक्सिजन सिलिंडरची संख्या कमी पडत असल्याची स्थिती आहे. घाटीत रोज १५ किलो लीटर (केएल) लिक्विड ऑक्सिजन लागत आहे. घाटीत ४८२ गंभीर रुग्ण दाखल आहेत. रुग्णांची ही संख्या पाहता, ऑक्सिजनचा भरलेला टँकर कायम उभा राहील, यासाठी प्रयत्न केला जात आहे.
---------
अशी वाढली ऑक्सिजनची मागणी
- २१ फेब्रुवारी - ८ टन रोज
- ६ मार्च - १५ टन रोज
- १ एप्रिल - ५४ टन रोज
- १५ एप्रिल - ६० टन रोज
------
एप्रिल २०२०मध्ये लागला १३९.९६ टन ऑक्सिजन.
सध्या रोज ६० टन ऑक्सिजन.
-------
जिल्ह्याला विविध ठिकाणांहून होतो ऑक्सिजनचा पुरवठा
वाळूज येथील दोन आणि गेवराई तांडा, शेंद्रा येथील दोन अशा चार पुरवठादारांकडून जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यात एअर काॅम्प्रेसरद्वारे हवेतील ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरले जाते आणि त्यानंतर या सिलिंडरचा रुग्णालयांना पुरवठा केला जातो. तर टँकरद्वारे लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. चाकण-पुणे, रायगड, ठाणे आदी ठिकाणाहून औरंगाबादेत लिक्विड ऑक्सिजन येते.
------
मागणीत होतेय वाढ
औरंगाबादेत ऑक्सिजनच्या मागणीत दररोज वाढ होत आहे. आजघडीला रोज ६० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. सध्या पुरवठा सुरळीत आहे. पुढील दिवसात किती ऑक्सिजन लागेल, याचा आढावा घेऊन नियोजन केले जात आहे.
- मिलिंद काळेश्वरकर, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषधे)