---
औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटीला मिळालेले पॅकबंद ३७ व्हेंटिलेटर दुरुस्त करुन इंन्स्टाॅलेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुपरस्पेशालिटी विंगमधून ट्रक भरुन शहरातील कंपनीच्या वर्कशाॅपवर रवाना करण्यात आले. पाणी जमा होत असलेल्या व्हेंटिलेटरचा ऑटोड्रेन बदलून २ दिवसांत कंपनीचे अभियंते त्या ३७ व्हेंटिलेटरचे इंन्स्टाॅलेशन करुन देतील, असे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी सांगितले.
मेडिसीन विभागातील दुरुस्त केलेले १८ पैकी २ व्हेंटिलेटर वापरण्यासाठी सोमवारी सायंकाळी वाॅर्डात पाठवण्यात आले. सध्या रुग्ण कमी असल्याने आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर वापरासाठी काढण्यात येणार आहेत. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरु होती. गरज भासेल त्या रुग्णांना ते व्हेंटिलेटर लावण्यात येणार आहे.
सुपरस्पेशालिटी विंगमध्ये ३७ पॅकबंद असलेले दमन थ्री चे ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर इंस्टाॅलेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या वर्कशाॅपवर हलवण्याचा निर्णय झाल्याचे सुपरस्पेशालिटी विंगचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या व्हेंटिलेटरचे प्रत्येकी तीन खोके एका ट्रकमध्ये भरुन वर्कशॉपवर कंपनीचे आशुतोष गाडगीळ, राजेश रॉय, विक्रमसिंह राणा यांच्या म्हणण्यानुसार हलवण्यात आले. ते पुढील दोन दिवसांत घाटीला परत मिळतील, असे डॉ. चौधरी म्हणाले.
घाटीत दुरुस्त झालेल्या १८ व स्टॅण्डबाय म्हणून ठेवलेल्या एका व्हेंटिलेटरची दुरुस्ती झाली आहे. ते व्हेंटिलेटर उपयोगात घेण्यासाठी खंडपीठाच्या निर्देशानुसार सोमवारी घाटी प्रशासनाने तयारी केली. मात्र, सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने केवळ २ व्हेंटिलेटर वापरण्यासाठी वाॅर्डात पाठवले. आवश्यकतेनुसार ते व्हेंटिलेटर तज्ज्ञ, तंत्रज्ञ व कंपनीच्या अभियंत्यांच्या उपस्थित रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येतील, असे मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या.