छत्रपती संभाजीनगर : चेहऱ्यावर विजेचा धक्का बसल्याप्रमाणे, अनेक सुया टोचल्याप्रमाणे वेदनेने त्रस्त एका ५१ वर्षीय महिलेवर घाटीत प्रथमच ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन’चे यशश्वी उपचार करण्यात आले. घाटीबरोबर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही अशा प्रकारच्या उपचाराची पहिलीच वेळ असल्याचेही सांगण्यात आले. हा उपचार शहरातील काही ठरावीक पेन मॅनेजमेंट सेंटरमध्ये होताे. त्यासाठी किमान ५० हजार रुपये खर्च येतो; परंतु घाटीत हे उपचार पूर्णपणे मोफत झाले, हे विशेष.
सदर महिला बऱ्याच वर्षांपासून चेहऱ्यावर होणाऱ्या असह्य वेदनांनी म्हणजे ट्रायजेमिनल न्यूरलजिया या आजाराने त्रस्त होती. ती घाटीतील भूलशास्त्र विभागांतर्गत नव्यानेच सुरू झालेल्या वेदना निवारण ओपीडीत आली. भूलशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्योती कुलकर्णी यांच्याकडे उपचार सुरू होते. महिलेस रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. गायत्री तडवळकर आणि सर्जरी विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व भूलशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुचेता जोशी यांच्या मदतीने महिलेस एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व म. ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत वाॅर्ड क्र.- २१ मध्ये भरती केले.
यांनी केली ही प्रक्रियाघाटीतील सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमधील कॅथलॅबमध्ये रुग्णावर रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन ही प्रकिया भूलशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक व वेदना निवारणतज्ज्ञ डॉ. अरविंद राजगुरे यांनी केवळ स्थानिक भूल देऊन केली. डॉ. ज्योती कुलकर्णी यांनी साहाय्य केले. भूलशास्त्र विभागातील डॉ. अंकिता बियाणी, डॉ. नेहा पाटील व डॉ. नितीन इंगोले, कॅथलॅबमधील फ्लुरोस्कोपी मशीन हाताळण्याचे काम हे कॅथलॅब टेक्निशियन पूजा जगताप, इंचार्ज सिस्टर छाया कल्पेश्वरी, इंदिरा किलबिले, सरोज कुलकर्णी यांच्यासह सर्व परिचारिका, युनूस आणि अजय बंडल यांचे सहकार्य मिळाले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठपुराव्यातून घाटीत नवनवीन उपचार सुरू होत आहेत.
काय आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन? घाटीत सुरू झालेल्या नव्या उपचार पद्धतीत एका सुईच्या मदतीने आणि कॅथलॅबमधील फ्लुरोस्कोपी मशीनच्या मदतीने वेदना दूर करण्याची प्रक्रिया केली. यात वेदना देणाऱ्या नसा निष्क्रिय केल्या जातात. मात्र, त्या कायमस्वरूपी निष्क्रिय केल्या जात नाहीत, असे वेदनानिवारणतज्ज्ञ डॉ. अरविंद राजगुरे म्हणाले.