औरंगाबाद : गुन्ह्यातील जप्त मोटारसायकल सोडण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तीन हजार रुपयांची लाच घेताना पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यापोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई पैठण एमआयडीसी पोलीस ठाणे येथे ६ जून रोजी करण्यात आली.सोमनाथ वामनराव जाधव (३६, रा. पोलीस कॉलनी, एमआयडीसी पैठण) असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांची मोटारसायकल एका गुन्ह्यात एमआयडीसी पैठण पोलिसांनी जप्त केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जाधव यांच्याकडे होता. यामुळे तक्र ारदार हे त्यांची मोटारसायकल सोडविण्यासाठी हवालदार जाधव यांना भेटले. त्यावेळी जाधव यांनी मोटारसायकल सोडण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश धोकरट आणि कर्मचाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यावेळी हवालदार जाधव यांनी पंचांसमक्ष पाच हजार रुपये लाच मागितली आणि तीन हजार रुपये घेऊन येण्याचे तक्रारदारांना सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी काही वेळानंतर लाचेचे तीन हजार रुपये देताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लाचेच्या रकमेसह हवालदार जाधव यांना रंगेहात पकडले. याविषयी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात हवालदार जाधवविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.----------
पाच हजार रुपये लाच घेताना पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचा हवालदार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:28 PM