पैठण: मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा शक्तीशाली गुढ आवाजाने पैठण शहर व परीसराला दणका दिला. गेल्या आठ वर्षात पैठण परिसराला अशा गुढ आवाजाचे ३३ वेळा हादरे बसले आहेत. विशेष म्हणजे, भूकंप मापन यंत्रावर कसलीही नोंद न होणाऱ्या गुढ आवाजाचा शोध घेणाऱ्या भारतीय भूगर्भ वैज्ञानिक शास्त्रज्ञांनी देखील या आवाजा समोर हात टेकले आहेत. यामुळे हा आवाज कशाचा या प्रश्नाचे उत्तर अद्याप न मिळाल्याने आवाजाचे गुढ वाढले आहे.
शहरात मंगळवारी दुपारी १.४७ वा. जोरदार गुढ आवाजाने पैठण शहर हादरले आवाजाच्या तीव्रतेने नागरिकामधे थोडावेळ चलबिचल झाली. आवाजाची तीव्रता जास्त असल्याने अनेक नागरिकांच्या घराच्या भिंती हादरल्या, छताचे पत्रे थरथरले, खिडकीच्या काचा कंप पावल्या, मातीच्या घराच्या भिंतीची माती घसरली. या प्रकाराने नागरिकांची भितीने गाळण उडाली. आठ वर्षात ३३ गुढ आवाजाचे दणके गेल्या ८ वर्षात आज ही तेहतीस वेळा गुढ आवाज होता. दरम्यान, गूढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, पैठण शहराला फेब्रुवारी ते मे महिण्या दरम्यानच असे हादरे बसले आहेत.
पैठण परिसरात जायकवाडी सारखे मोठे (१०२टी एम सी) क्षमतेचे धरण असल्याने शंकाकुशंकेने नागरिकांची झोप उडाली आहे. वारंवार असे धक्के बसत असताना जिल्हा प्रशासन मात्र मौन बाळगून आहे प्रशासनाकडून कसलाच खुलासा होत नसल्याने या आवाजाचे गूढ वाढतच चालले आहे. शास्त्रज्ञांना सुध्दा गुढ आवाजाचे रहस्य उलगडले नाही. पैठण शहर व तालुक्यात सातत्याने भुगर्भात होत असलेल्या गुढ आवाजाचे संशोधन करण्यासाठी नागपूर येथील भारतीय भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे पथक पैठण येथे दि १२ ऑगस्ट २०१५ रोजी दाखल झाले होते. वरिष्ठ भुगर्भशास्त्रज्ञ महेश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने गुढ आवाजाचे संशोधन करण्यासाठी माती खडक आदीचे नमुने नेले होते. तथापी पैठण शहर व परिसरात सातत्याने होणाऱ्या गूढ आवाजाचे रहस्य शोधताना जिओलॉजिकल सर्वे ऑफ ईंडिया, नागपूर चे भूगर्भशास्त्रज्ञ ठोस निष्कर्ष काढू शकले नाहीत. परंतू या शास्त्रज्ञांनी पैठण व नागपूर येथील भूकंप मापन यंत्राच्या नोंदीचा हवाला देत या आवाजाचा व भुगर्भीय हालचालीचा काही एक संबंध नसल्याचे ठामपणे जायकवाडी प्रशासनास दिलेल्या अहवालात मांडले आहे. विशेष म्हणजे, या अहवालात आवाजाच्या घटना घडल्या आहेत हे शास्त्रज्ञांनी देखील मान्य केले असल्याने शेवटी हा आवाज नेमका येतो कोठून या प्रश्नाचे उत्तर अद्यापही अनुत्तरितच राहिले आहे.