पैठण : मंगळवारी रात्री पैठण तालुक्यातील सात महसूल मंडळांत मंगळवारी अतिवृष्टीची नोंद झाली असून, पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बोकूड जळगाव येथे एकाचा, तर भिंंत अंगावर पडल्याने नांदर येथे एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील सर्वच पाझर तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने तलावाखालील गावांतील नागरिकांनी रात्र जागून काढली. अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेल्याने आतोनात नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पैठण तालुक्याला पाऊस झोडपून काढत आहे. मंगळवारी पुन्हा सात महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मंगळवारी बिडकीन ११४ मि.मी., आडूळ ११७, ढोरकीन ७१, बालानगर ७५, नांदर ७४, पाचोड ७०, विहामांडवा ७३ मि.मी. असा पाऊस झाला. वीरभद्रा, येळगंगा, गल्हाटी नद्यांना महापूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. औरंगाबाद-पैठण रस्त्यावर चार ठिकाणी नदीप्रमाणे पाणी वाहत असल्याने रात्री वाहतूक बंद होती.
चौकट
दुचाकीसह एक जण वाहून गेला
नांदर येथे मंगळवारी रात्री भिंत पडल्याने दबून सुंदराबाई गरड (९०) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला, तर रात्री १० वाजेदरम्यान मुलासह दुचाकीने बोकूडजळगावकडे जात असताना गावाच्या अलीकडील ओढ्यात आलेल्या महापुरात कोंडिराम लोखंडे (४६) हे दुचाकीसह वाहून गेले. दरम्यान, सुदैवाने मुलगा वाचला. कोंडिराम लोखंडेंना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके, बिडकीनचे पोनि. संतोष माने, फौजदार राहुल पाटील, मंडळ अधिकारी बोकूडजळगाव येथे तळ ठोकून आहेत.
चौकट
चार जनावरे दगावली
पावसादरम्यान पाटोदे वडगाव येथील कडूबाळ आवारे यांच्या शेतातील गोठ्यावर विद्युत खांबावरील तार तुटून पडल्याने गाय व शेळ्या मरण पावल्या.
चौकट
नांदर पुलाच्या दोन कमानी वाहून गेल्याने वाहतूक बंद
वीरभद्रा नदीला गेल्या चार दिवसांपासून महापूर आलेला आहे. या पुराच्या तडाख्यात नांदर येथील पुलाच्या दोन कमानी वाहून गेल्या आहेत. दरम्यान, या पुलावरील चारचाकी वाहतूक बंद करण्यात आली असून, पूर ओसरल्यानंतर पुलाची किती क्षती झाली हे समोर येणार आहे. आडगाव जावळे, इनायतपूर येथील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाखालील गावांतील नागरिकांनी रात्र जागून काढली. विविध नदी- नाल्यांचे पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
फोटो :