पैठण : तालुक्यातील कावसान येथील एकाच परिवारातील तिघांचा निर्घृणपणे खून करणारा आरोपी हा माजी नोकर असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण औरंगाबाद व पैठण पोलिसांनी आरोपीस गंगापूर परिसरातून बुधवारी सायंकाळी अटक केली. अक्षय प्रकाश जाधव ( २७, रा . जुने कावसान ह.मु. माळीवाडी सोलनापुर ता पैठण ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अक्षय निवारे यांच्याकडे काम करत होता. परिवारातील सदस्या सारखा त्यास मान होता. मात्र, वर्षभरापूर्वी निवारे परिवाराने त्यास कामावरून काढून टाकले होते. या दरम्यान, निवारे परिवार व अक्षय जाधव यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते याचे पर्यवसान तिहेरी हत्याकांडात झाले.
दिनांक २८ रोजी रात्री राजू उर्फ संभाजी नारायण निवारे ( ३५ ), त्यांची पत्नी अश्विनी ( ३० ) , मुलगी सायली (९ ) यांच्या डोक्यावर , गळयावर धारदार शस्त्राने वार करुन निर्घृणपणे खून करण्यात आला होता. निर्दयीपणे झालेल्या या हल्ल्यात या परिवारातील ७ वर्षाचा मुलगा सोहम संभाजी निवारेचा मृत्यू झाला असे समजून सोडून दिल्याने तो बचावला होता. संपूर्ण कुटुंब संपविण्याच्या उद्देशाने झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण तालुका हादरला होता. हत्याकांड घडल्यानंतर आरोपी अक्षय जाधव हा फरार झाला होता. आरोपीच्या शोधासाठी गेल्या ३५ दिवसापासून पोलीसांनी राज्यभर पथके पाठवून तपास केला मात्र आरोपीचा मागमूस लागत नव्हता. आरोपी मोबाईल बंद करुन सतत त्याचा ठाव ठिकाणा बदलत असल्याने तो मिळून येत नव्हता.
पोलीस निरीक्षक भागवत फुंंदे यांना दि ६ रोजी त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून आरोपी अक्षय प्रकाश जाधव हा त्याच्या जवळील एका विना क्रमाकांच्या मोटारसायकलने येवला येथून औरंगाबादकडे येत आहे , अशी खात्रीलायक माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक भागवत फुदे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथके तयार करुन पोलीस ठाणे येवला , कोपरगांव , वैजापुर , विरगांव , गंगापुर , शिल्लेगांव , शिऊर व देवगांव रंगारी पोलीस ठाण्यास नाकाबंदी करण्याचे आदेश दिले . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अक्षय प्रकाश जाधव याचा शोध घेत असतांना तो महालगाव ( ता . वैजापुर ) येथे रोडने वैजापुरकडून गंगापुरकडे एका विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर येतांना दिसल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला. असता त्याने त्याचे जवळील मोटार सायकल सोडून तो शेताने पळून जाऊ लागला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद आरोपीचा जवळपास दोन किलो मिटर पाठलाग करुन त्यास पकडले.
चौकशीत अक्षयने जुन्या वादातून तिघांची हत्या केल्याची कबुली दिली. गुन्हा केल्यापासून तो नाशिक , पुणे , मुंबई , जालना , औरंगाबाद इत्यादी ठिकाणी भटकत असे. रात्री रोडच्या कडेला असलेल्या शेतामध्ये झोपत होता असे सांगितले. तसेच त्याच्या ताब्यात मिळून आलेली मोटार सायकल त्याने पोलीस ठाणे चिकलठाणा हद्दीतील झाल्टा फाटा येथून चोरुन आणल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून एक मोटारसायकल , एक मोबाईल हॅन्डसेट , एक चाकू , एक लोखंडी रॉड, एक सायकलची लोखंडी चैन असे एकुण ३५,००० / - रुपये किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील , सहायक पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे पोउपनि गणेश राऊत , संदीप सोळंके , सफौ सय्यद झिया , प्रमोद खांडेभराड , किरण गोरे , विक्रम देशमुख , श्रीमंत भालेराव , धिरज जाधव , पोना / वाल्मीक निकम , राहूल पगारे , संजय भोसले , नरेंद्र खंदारे पोकॉ ज्ञानेश्वर मेटे , संजय तांदळे यांनी आरोपीस अटक केली . या प्रकरणी पुढील तपास पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि गजानन जाधव , पोउपनि छोटुसिंग गिरासे , रामकृष्ण सागडे हे करीत आहेत.
पैसे संपल्याने फोन केला आणि अडकलाआरोपी अक्षय जाधव याच्याकडील पैसे संपल्याने मोटारसायकलमध्ये पेट्रोल कसे भरावे या विचारात तो होता. दरम्यान, अंदरसूल (ता येवला) येथील एका पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याच्या फोनवरून त्याने एका मित्राला फोन करून पेटीएमने पैसे पाठविण्यास सांगितले. मात्र, आरोपीच्या मित्रास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याने आरोपीचे लोकेशन पोलीसांना मिळाले. तेथून पुढे पोलीस त्याच्या मागावर निघाले. वैजापूर येथून गंगापूरकडे येत असताना महालगाव येथे पोलीसांनी त्यास अटक केली.