राज्य निवडणूक आयोगाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार पैठण तालुक्यातील ८० व वैजापूर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान घेण्यात आले होते. निवडणूक कार्यक्रमानुसार ८ डिसेंबर, २०२० रोजी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले होते. मात्र, हे आरक्षण रद्द करण्यात आले. नव्याने केवळ ओबीसी व महिला आरक्षणात बदल केला जाणार होता. मात्र, पैठण तालुक्यातील हिरडपुरी व पाचोड खुर्द ग्रामपंचायतीचे अनुसूचित जातीचे आरक्षण सोडतीत रिपीट झाल्याने तालुक्यातील काढलेले सरपंचपदाचे आरक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले होते.
एका आरक्षणात चूक झाल्याने त्याचा परिणाम तालुक्यातील इतर आरक्षणावर पडणार असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. दाखल याचिकेवर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने सर्व आरक्षण नव्याने काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ६ फेब्रुवारीला आरक्षण काढण्याचा आदेश दिला आहे.