- संजय जाधव
पैठण (औरंगाबाद ) : पैठणकरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या रूग्णालयात रूग्णांच्या जीवाशी खेळ मांडला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे रुग्णालय पैठणचे घाटी रुग्णालय म्हणून ओळखले जाते. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयासारख्या येथे सुविधा असल्या तरी प्रशासकीय उदासिनतेने या घाटीचा बट्ट्याबोळ झाला आहे. यामुळे रुग्णांनी जावे तरी कोठे, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.
पाच वैद्यकीय अधिकारी असलेल्या या रूग्णालयात केवळ एकच वैद्यकीय अधिकारी आहे. मागील काही वर्षांपासून येथे डॉक्टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्नीशियनची अशी सुमारे ३५ टक्के पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कर्मचारी गायब होते. हे कर्मचारी कोठे गेले, हे विचारण्यासाठी सुद्धा कोणीच तेथे उपलब्ध नव्हते. या परिस्थितीत रूग्णांची हेळसांड होताना मात्र दिसून आली. यातच पाहणीदरम्यान रूग्णालयात रूग्णांच्या रक्ताचे नमुने चक्क चतुर्थ श्रेणी कर्मचारी घेत असल्याचे दिसून आले. यामुळे शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांचे मात्र हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मनुष्यबळाअभावी रुग्णांना सोयी-सुविधा मिळत नाहीत, उपचारासाठी तासन्तास थांबावे लागते. यामुळे शासकीय रुग्णसेवाच आजारी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
प्रपाठक व वैद्यकीय अधिकारी कायमच गैरहजरशासकीय रुग्णालयात प्रपाठक डॉ. भारत चव्हाण, डॉ. सचिन अवसरमल, डॉ. अनिरुद्ध लोंढे, डॉ. कणसे, डॉ. संदीप रगडे व ऋषीकेष मानधने असे सहा वैद्यकीय अधिकारी आहेत. गुरूवारी दुपारच्या सत्रात रूग्णालयात डॉ. खणसे हेच उपस्थित होते. उर्वरित डॉक्टरांबाबत विचारले असता आॅनकॉलवर हे डॉक्टर रूग्णालयात येतात असे त्यांनी सांगितले. मात्र डॉ. कणसे हेच ओपीडी व आयपीडीच्या रूग्णांना तपासत असल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक वैद्यकीय अधिकारी तर चक्क १५ दिवसांपासून रूग्णालयातच आला नसल्याचे रूग्णालयातील विश्वासू सूत्राने सांगितले. इतर दोन डॉक्टरांचे पैठण शहरात मोठे हॉस्पिटल असून ते डॉक्टर तेथेच असतात. रूग्णालयात मात्र एकच वैद्यकीय अधिकारी हजर राहतो व तो सर्वांची ड्युटी करतो. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर डॉक्टर उपलब्ध न झाल्याने रूग्णांच्या जीवावर बेतत आहे.
वरिष्ठांनी लक्ष घालावे
रूग्णालयात रूग्णाप्रती डॉक्टरांची संपुष्टात आलेली आस्था, भौतिक सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांची कमतरता व नोकरी आहे म्हणून करायची या भावनेतून केली जाणारी रूग्णसेवा रूग्णांच्या जीवावर उठली असल्याची भावना पैठणकरांच्या मनात निर्माण झाली आहे. रूग्णालयातील प्रशासन वठणीवर आणून रूग्णसेवा सुरळीत करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.