पैठण : राज्य संरक्षित स्मारक व पैठण येथील समृद्ध शालिवाहन राजवटीचे प्रतीक असलेल्या प्राचीन तीर्थखांबाचे संवर्धन व परिसर विकास कामासाठी पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातून एक कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. शास्रोक्त पध्दतीने तीर्थखांब संवर्धनाचे काम सुरू झाले असल्याचे नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी सांगितले. तीर्थखांबाचे संरक्षण व परिसर विकास झाल्यानंतर पैठणचा ऐतिहासिक ठेवा असलेला तीर्थखांब इतिहास प्रेमींसाठी पर्वणी ठरणार असल्याचे लोळगे यांनी सांगितले.
वाचा : ‘शालिवाहन’ इतिहासाची साक्ष देणारा पैठणचा तीर्थस्तंभ
१९९६ मध्ये राज्य संरक्षित स्मारक घोषित झाल्यानंतरही तीर्थखांबाचे योग्य संवर्धन झाले नाही. खांबावरील नक्षीकाम पुसट होऊन पापुद्रे पडत असल्यामुळे रासायनिक प्रक्रिया करणे गरजे होते. परंतू निधीअभावी काहीच करता येत नसल्याने राज्य पुरातत्त्व विभागाची या राज्य स्मारकाबाबत उदासीनता समोर आली होती. तीर्थखांबाचे संवर्धन करून परिसर विकास करण्यात यावा अशी मागणी ईतिहास प्रेमींनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी प्राधिकरणाच्या बैठकीत या बाबत प्रस्ताव मांडला. या प्रसतावास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी व सह अध्यक्ष आमदार संदिपान भुमरे यांनी मंजुरी देत एक कोटी रूपयाचा निधी मंजूर केला.
प्राधिकरणास एक कोटीचा निधीप्राधिकरणाने एक कोटी रूपयाचा निधी मंजूर केला असून राज्य पुरातत्व विभागा मार्फत हे काम करण्यात येत आहे. या अंतर्गत करण्यात येणारे बांधकाम सिमेंट ऐवजी चुन्यात करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम दगडात होणार असून यासाठी काळा दगड वापरण्यात येत आहे. तिर्थखांबास रासायनिक लेप लावून जतन करण्यात येणार आहे. परिसरातील फरशी सुद्धा ब्लॅक स्टोनची राहणार आहे. परिसरात गार्डन, रंगीत प्रकाश झोत व्यवस्था करण्यात येणार आहे असे नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी सांगितले.
तीर्थस्तंभ आहे राज्य संरक्षित स्मारक भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केलेल्या आहेत. या स्मारकाची देखभाल आणि संरक्षणाचे काम पुरातत्त्व खाते करते. भारत सरकारने घोषित केलेल्या अशा संरक्षित स्मारकांना हानी होऊ नये यासाठी इ.स. १९५१ साली ऐतिहासिक वास्तू व स्मारके जतन कायदा करण्यात आला आहे. १९९६ मध्ये पैठणच्या तीर्थखांबास राज्य संरक्षित स्मारक म्हणून राज्य पुरातत्व खात्याने घोषित केलेले आहे.
तीर्थखांबाचा इतिहास शालिवाहन सम्राट पुलोवामी याने दक्षिण भारतावर विजय मिळवला. विजयानंतर प्रतिष्ठानला ( पैठण) राजधानी म्हणून घोषित केले. पैठण येथे दगडाचा कोरीव असा विजयस्तंभ उभारला यालाच तीर्थखांब असे नाव पडले. यानंतर युध्दात विजय मिळाल्यानंतर या ठिकाणी विजयी वीरांचा सत्कार व विजयोत्सव साजरा करण्यात येत असे. म्हणुन याला 'विजयस्तंभ' असेही म्हणतात.
ऐतिहासिक वारसा जतन करणे आवश्यक पैठण नगरीचे धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक, पर्यटन दृष्टीने खुप महत्त्व आहे. या वारशाचे नीट जतन करुन त्याला पूर्ववैभव आणि प्रतिष्ठा प्राप्त करुन देणे येणाऱ्या पिढीसाठी आवश्यक आहे. याच उद्दिष्टाने पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून हे काम हाती घेण्यात आले आहे.- सुरज लोळगे, नगराध्यक्ष व उपाध्यक्ष प्राधिकरण.