वाळूज महानगर : पवनपुत्र हनुमान जन्मोत्सवानित्ति जागृत हनुमान मंदिर संस्थानतर्फे बजाजनगर येथे गुरुवारी सायंकाळी टाळ-मृदुंगाच्या गजरात हनुमानाचा जयघोष करीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान थोरांपासून सर्वांनी पावली व फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त जागृत हनुमान मंदिर संस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी सायंकाळी जागृत हनुमान मंदिरापासून सजवलेल्या रथात ज्ञानेश्वरी गं्रथ व दिंडी पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. लोकमान्य चौक, पंचमुखी महादेव मंदिर, दत्त मंदिर मार्गे हनुमानाचा जयघोष करीत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीचा हनुमान मंदिरात समारोप करण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला, पुरुष व लहान मुलांनी पावली व फुगडी खेळून मिरवणुकीला रंगत आणली.
यावेळी नऊवारी साडी नेसून डोक्यावर कलश घेतलेल्या महिला व तरुणींनी सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा शिंपडून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. अनेक ठिकाणी नागरिकांनी सहकुटुंब पालखीचे स्वागत करीत पालखी दर्शनाचा लाभ घेतला. शुक्रवारी पहाटे महाअभिषेक झाल्यानंतर सकाळी ६: ३६ मिनिटांनी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
दुपारी ह.भ.प ढवळे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. यशस्वीतेसाठी मंदिर संस्थानचे रंगनाथ ठुबे, अर्जुन उबाळे, रंगनाथ बोरसे, निलेश सोनवणे, एम.डी. पवार, अनिल पाटील, तात्याराव वानखेडे, घनश्याम पाटील, आदिकराव पाटील आदींनी परिश्रम घेतले.