संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेत कर्करोगाने त्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी पॅलेटिव्ह केअर बाह्यरुग्ण सेवेत (ओपीडी) दाखल होत आहे. यातून रुग्णांच्या वेदना कमी करणे, त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन आणि रुग्णांप्रती जागृतीचा उद्देश साध्य केला जात आहे.जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. आजारांच्या यादीत कर्क रोग महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. कॅन्सर अर्थात कर्क रोग म्हणजे आयुष्य संपल्यात जमा असा पूर्वी समज असे. परंतु आजघडीला उपचारातील सोयी-सुविधांमुळे कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. विविध उपायांबरोबरच इच्छाशक्तीने आजारावर मात केलेल्या रुग्णांच्या यशोगाथेमुळे हे चित्र आता बदलत असल्याचे दिसते.मराठवाड्यात गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणाºया शासकीय कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत हजारो रुग्णांना येथील उपचारामुळे नवीन आयुष्य मिळाले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हे, धुळे, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, अहमदनगर, जळगाव, नाशिक तसेच अन्य राज्यांमधूनही रुग्ण येतात. विदेशी रुग्णही उपचारासाठी येतात. कर्करोग रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. या रुग्णालयात टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळालेले भाभाट्रॉन-२ हे विशेष यंत्र स्थापित करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णसेवेत आणखी भर पडणार आहे.आजारातील शेवटच्या टप्प्यात रुग्णांच्या वेदना पाहणे घरच्यांनाही शक्य होत नाही. दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी २०१२ मध्ये केंद्र शासनाने ‘पॅलेटिव्ह केअर’ योजना हाती घेतली. दुर्धर आजाराच्या या रुग्णांना उपचारात्मक चिकित्सा उपयोगाची नसून केवळ वेदना व लक्षणे कमी करणारी चिकित्सा उपयुक्त असते. कर्क रोग दिनानिमित्त कर्करोग रुग्णालयात पॅलेटिव्ह केअर ओपीडी सुरू करण्याकडे पाऊल टाकत आहे. याचा रुग्ण आणि रुग्णांच्या कु टुंबियांना मोठा आधार मिळेल.पॅलेटिव्ह केअर वाढावेसगळे उपचार संपल्यानंतर पॅलेटिव्ह केअर अशी संकल्पना होती. परंतु आता कर्करोगाच्या सुरुवातीपासूनच रुग्णांना पॅलेटिव्ह केअर मिळाले पाहिजे. त्यातून रुग्णाला आराम मिळेल, हा उद्देश साध्य केला जातो. टाटा हॉस्पिटलमध्ये ३० वर्षांपासून पॅलेटिव्ह केअर सुरू आहे. शिवाय २०१२ मध्ये एमडी इन पॅलेटिव्ह मेडिसीन अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करून मान्यता मिळवून घेतली. कर्करोगच नव्हे तर इतर आजारांसाठीही पॅलेटिव्ह केअर वाढले पाहिजे, असे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक (अकॅडमिक) डॉ. कैलास शर्मा म्हणाले.
वेदना कमी करणारे ‘पॅलेटिव्ह केअर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:23 AM
शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेत कर्करोगाने त्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी पॅलेटिव्ह केअर बाह्यरुग्ण सेवेत (ओपीडी) दाखल होत आहे. यातून रुग्णांच्या वेदना कमी करणे, त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन आणि रुग्णांप्रती जागृतीचा उद्देश साध्य केला जात आहे.
ठळक मुद्देजागतिक कर्करोग दिन : राज्य कर्करोग संस्थेत पॅलेटिव्ह केअर ओपीडीतून रुग्ण आणि कुटुंबास आधार