निधोना : फुलंब्री तालुक्यातील वावना व पाडळी(एकघर) दोन गावांना जोडणारा पाणंद रस्ता गायब झाला असून, ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गावातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पाच कि.मी. अंतर हेलपाटा मारून यावे लागते. शेतमाल ने-आण करतानाही शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
सन १९७२ सालच्या दुष्काळात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत बांधकाम विभागाने रस्ता क्र. ७४ या अंदाजे दीड कि.मी. अंतराच्या पाणंद रस्त्याचे काम पूर्ण केले होते. पाडळी येथून फुलंब्री- पिशोर हा प्रमुख रस्ता गेलेला आहे. तेथून वावना शिवारातील गट क्र. २५,१९,१८,१५,१०,९,८,४ या शेतजमिनीतून रस्त्याची निर्मिती करुन ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या वावना व पाडळी ही दोन्ही गावे एकमेकास जोडली होती. जवळपास १९८५पर्यंत सुमारे १५ वर्षे हा रस्ता वापरात होता; मात्र तेव्हा शासनाने या रस्त्याचे खडीकरण, मजबुतीकरण केले नाही. त्यानंतर रस्ता गेलेल्या जमिनींपैकी गट क्र.१८,१९,२५ मधील शेतजमिनी मूळ मालकांनी विकून टाकल्या. ज्या लोकांनी या जमिनी खरेदी केल्या, त्यांनी या जमिनीतून गेलेला रस्ताच नाहीसा केला. यानंतर त्यांचे अनुकरण इतर लोकांनीही केले व तेव्हापासून हा रस्ता गायब झाला आहे. यामुळे शासनाने केलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यात गेला. तसेच दोन्ही गावांतील नागरिकांना दीड कि.मी. ऐवजी पाच कि.मी. चा फेरा मारुन ये- जा करावी लागत आहे. यानंतरही या रस्त्याला मंजुरी मिळाली होती, मात्र ग्रामपंचायतमधील सत्ताधाऱ्यांनी या रस्त्याच्या नावाने दुसऱ्या रस्त्याचे काम केले. तेही काम आज अपूर्णावस्थेत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग मात्र अंधारातच असून या पाणंद रस्त्याची गुंतागुंत वाढली आहे. हा रस्ता होण्यासाठी दोन्ही गावातील लोकांनी फुलंब्री तहसीलदारांकडे ग्रामसभेच्या ठरावासह अर्ज केला असून पाणंद रस्त्याची निर्मिती करुन दोन्ही गावे जोडण्याची मागणी केली आहे. मात्र तहसील प्रशासन लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. यामुळे नागरिकांनी जर मागणी पूर्ण केली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. गुगलवर या पाणंद रस्त्याची वावना-पाडळी-लालवण-नायगाव अशी नोंद केलेली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
कोट
या पाणंद रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ काम करण्यात यावे. हा रस्ता माझ्या जमिनीतून गेलेला आहे. माझी त्याला संमती आहे, मात्र दोन ते तीन लोक विरोध करीत आहेत.
-सोमीनाथ जाधव, सरपंच ग्रुप ग्रा.पं. वावना-पाडळी.
कोट
मी सरपंच होतो तेव्हा वावना-पाडळी रस्त्याच्या खडीकरण, मजबुतीकरणासाठी निधीची मागणी केली होती; मात्र निधी मिळाला नाही. कालांतराने शेतकऱ्यांनी त्या पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता नाहीसा केला आहे.
-अशोक जाधव, माजी सरपंच, ग्रुप ग्रा.पं. वावना, पाडळी