स. सो. खंडाळकर
औरंगाबाद: कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नाही. याचा फटका वारकऱ्यांना तर बसलाच. पांडुरंगाच्या ओढीने त्यांचा जीव तळमळलाच. पण एसटीलाही पंढरीची ओढ लागली आणि नुकसानीचा मोठा फटका बसला.
* दरवर्षी पंढरपूरसाठी किती बस सोडल्या जायच्या-१००
*त्यातून किती उत्पन्न मिळायचे- दरवर्षी २० लाख
*एसटीतून दरवर्षी साधारण किती जण प्रवास करायचे- ५ हजार
कोरोनामुळे नुकसान होतंय एवढं नक्की...
पंढरपूरच्या विठुरायाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांची ने- आण करुन सेवा करण्यात एसटीलाही एक वेगळाच आनंद मिळायचा. परंतु कोरोनाने तोही हिरावून घेतला. यात एसटीचे मोठे नुकसान होत आहे, याचे वाईट वाटते.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, औरंगाबाद
...........................................
वारी करणारी माझी पाचवी पिढी...
पांडुरंगाची वारी करणारी माझी पाचवी पिढी आहे. पण कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडतोय. मागील ३० वर्षांपासून मी विना मानधन कीर्तने करतोय. दोन वर्षांपासून त्यालाही मोठा ब्रेक लागला. कोरोनाचं संकट आलं. ते दूर होवो, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना.
- ह.भ.प. नवनाथ महाराज आंधळे, औरंगाबाद
.......................
कोरोना लवकर संपव रे पांडुरंगा...
मागील दहा वर्षांपासून शिवपार्वती भजनी मंडळाच्या आम्ही दहा-बारा महिला न चुकता वारीला जात होतो. कोरोनामुळे मागच्या वर्षी जाता आलं नाही. यावर्षी आमच्या मंडळाच्या भारूडकार सुरेखा अशोक पगार यांचा मृत्यू झाला. त्या दु:खातून मंडळ अजूनही सावरलेले नाही. यावर्षी पंढरपूरला जाता येत नाही. परंतु पैठणच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आम्ही भजन करणार आहोत आणि विठुरायालाही सेवा अर्पण करणार आहोत.
-सुरेखा शिवराम साळुंखे, औरंगाबाद
......................
पैठणची पालखी रवाना..
महाराष्ट्रातील मानाच्या १० पालख्यांपैकी पैठणची पालखी सोमवारी पंढरपूरकडे रवाना झाली. आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराज यांच्या पादुका पालखीचे परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने नाथमंदिरातून ४० वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शासनाने पायीवारी रद्द केल्याने औपचारिक प्रस्थान झाल्यानंतर गेल्या १८ दिवसांपासून नाथांच्या पादुका गावातील नाथमंदिरात मुक्कामी होत्या. ४२३ वर्षांची पायीवारीची ही प्रथा आहे. रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व पालखी प्रमुख हभप रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते नाथमंदिरात पादुकांची आरती करण्यात आली. भुमरे व रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते नाथमंदिरातून पादुका शिवशाही बसमध्ये स्थानापन्न करण्यात आल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी भानुदास एकनाथ नामाचा गजर केला. पोलीस बंदोबस्तात पालखी रवाना झाली.