वाळूज महानगर : अज्ञात वाहनाने वीज पुरवठा करणाऱ्या खांबाला धडक दिल्यामुळे हा पोल आडवा पडला. परणामी पंढरपूर सोमवारी रात्रीपासून काळोखात बुडाले आहे. सोमवारी रात्री खंडीत झालेला वीज पुरवठा मंगळवारी दिवसभर पूर्ववत झालेला नव्हता. त्यामुळे गावातील घरगुती तसेच व्यवसायिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
पंढरपूर गावाचा सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाला होता. दुसऱ्या दिवशी बजाजनगरातील महावितरणच्या कार्यालयात ग्राहकांनी तक्रारी केल्या. महावितरणचे सहायक कार्यकारी अभियंता राजेश भगत, उपअभियंता राठोड यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसरात पाहणी करुन बिघाड शोधला. पंढरपुरातील नगररोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपासमोरील विद्युत पोल आडवा पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याचे अभियंत्यांच्या लक्षात आले. या पोलवरुन मुख्य वीजवाहिनी गेल्यामुळे पोल आडवा झाल्याने प्रवाह असलेल्या तारा तुटून पुरवठा खंडित झाल्याचे स्पष्ट झाले.
या भागातील व्यवसायिकाकडे चौकशी केली असता त्यांनी सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास एक ट्रकने या विद्युत पोलला धडक दिल्याचे सांगितले. अचानक मोठा आवाज होऊन वीज पुरवठा खंडित झाला. घटनेनंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला आहे. मंगळवारी सकाळी कर्मचाºयांनी नवीन पोल बसविण्याचे काम हाती घेतले होते. सांयकाळी ५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पुर्ण होऊन वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याचे सहायक अभियंता भगत यांनी सांगितले.