पानी फाउंडेशनचे मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ शिबिरात बोलताना म्हणाले की, ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा’ सहा स्तंभांवर चालते. यात मृदा व जलसंधारण, जलव्यवस्थापन, वृक्षांची आणि जंगलांची वाढ, पौष्टिक गवताचे संरक्षित कुरण क्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य सुधारणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविणे यांचा समावेश होतो. या स्पर्धेंतर्गत प्रतिव्यक्ती तीन झाडे लावणे आणि संवर्धन करणे अभिप्रेत आहे. पूर्वीपेक्षा जास्त रासायनिक खते, कीटकनाशकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जमिनीचा पोत कमी झाला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावाने जोमाने कामाला लागावे, असे आवाहन डॉ. अविनाश पोळ यांनी केले. त्यानंतर कृषी विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक उदय देवळाणकर यांनी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी व्ही. जे. नरवडे, प्रा. आरेफ शेख यांची उपस्थिती होती. जिल्हा समन्वयक प्रल्हाद आरसूळ यांनी बैठकीत प्रास्ताविक केले. तालुका समन्वयक गजेंद्र येळकर यांनी आभार मानले.
फोटो : खुलताबादेतील पानी फाउंडेशनच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. अविनाश पोळ.