औरंगाबाद : ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व सर्वत्र दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचण्यापूर्वी मुंडे यांनी १६ मिनिटे आणि पंतप्रधान आल्यानंतर ५ मिनिटे भाषण केले.
ग्रामविकास विभागातर्फे बनविण्यात आलेले बॅनर, पोस्टर आणि माहितीपटांमध्येही त्यांची छबी उठून दिसत होती.राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्याला राज्यभरातून एक लाखांपेक्षा अधिक महिला आल्या होत्या. या महिलांच्या येण्या-जाण्याच्या व्यवस्थेसह मेळाव्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे नियोजन पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात झाले आहे. मुंबई-दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत आॅरिक सिटीच्या उद्घाटनाचा सोहळाही पार पडला. त्यामुळे यात उद्योग विभागाचे वर्चस्व राहील, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांचेच नेतृत्व आणि नियोजन उठून दिसले. पूर्ण मेळाव्यात सबकुछ पंकजा अशीच स्थिती असल्याचे दिसून आले. पंकजा मुंडे यांनी पंतप्रधानांचे औरंगाबादेत आगमन होण्यापूर्वी एक वाजताच खचाखच भरलेल्या सभामंडपातील महिलांसमोर भाषण केले. यात त्यांनी काही महिलांना धनादेशाचे वाटपही केले. यात त्यांनी ग्रामविकास विभागात केलेल्या कामांची जंत्रीच सादर केली.
कार्यक्रमस्थळी पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ५ मिनिटांचे प्रास्ताविक केले. यात त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. २०१४ साली ग्रामविकास विभागाचा पदभार घेतला तेव्हा उमेद अभियानांतर्गत १० जिल्ह्यांतील ५४ हजार १६९ बचत गट कार्यरत होते. पाच वर्षात हे अभियान ३४ जिल्ह्यांत पोहोचवत ४ लाख ५ हजार बचत गटांच्या माध्यमातून ४७ लाख ५५ हजार कुटुंबांना जोडण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय ग्रामविकास विभागातर्फे दाखविण्यात आलेल्या विविध माहितीपटांमध्येही पंकजा मुंडे यांची छबी, मनोगत दाखविण्यात आले. या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाही मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही, हे विशेष.बहन पंकजा को बधाईपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या मनोगतामध्ये सुुरुवातीलाच गौरी महालक्ष्मीचा उत्सव असतानाही एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या आहेत. त्याबद्दल ‘बहन पंकजा को बधाई देता हंू’ असे सांगितले. तेव्हा सभामंडपात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला