लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : येथील संत ज्ञानेश्वर उद्यानामधील संगीत कारंजे मागील दहा दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. प्रशासनाच्या कारभाराविरूद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.राज्यभरातून सध्या येथे शाळेच्या सहली येत असून लहान मुलांना व पर्यटकांना आकर्षित करणारे मराठी व हिंदी चित्रपटातील गाण्याच्या तालावर नृत्य करणारे संगीत कारंजे पाहावयास मुकावे लागत आहे. संगीत कारंजे बंद असल्याने पर्यटक पैठणमध्ये मुक्कामी न थांबता परतीचा प्रवास करत आहेत.त्यामुळे पर्यटकांवर अवलंबून असलेल्या धर्मशाळा, हॉटेल्स, उपहारगृह व पैठणी साडी व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. उद्यानाच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.शासनाच्या उद्देशाला हरताळशासनाने जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर म्हैसूर व वृंदावन या उद्यानाच्या धर्तीवर येथे उद्यानाची निर्मिती केली. जायकवाडी धरण पर्यटकांचे आकर्षण असल्यामुळे येथे उद्यानाची निर्मिती करून शासनाच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल, असा उद्देश ठेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने संत एकनाथ महाराजांच्या जन्मभूमीत हे उद्यान सुरू करण्यात आले. पर्यटकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल आतापर्यंत शासनाच्या तिजोरीत जमा झाला. परंतु शासनाने उद्यानाला विकसित करण्यापासून नेहमीच वंचित ठेवले आहे. त्यामुळेच उद्यानाची दुर्दशा पाहायला मिळत आहे. आता तरी या तुघलकी कारभारात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा पैठणकर व पर्यटनप्रेमी करीत आहेत.येथील उद्यानाला दररोज भेट देणाºया पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यातच नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात शालेय सहली व पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते व त्या काळात शहरातील बाजारपेठेत चांगली उलाढाल होते. नेमक्या याच वेळी संगीत कारंजे बंद पडल्याने पर्यटक मुक्काम न करताच माघारी फिरत असल्याने याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. संगीत कारंजे लवकरात लवकर सुरू करून उद्यान अजून प्रेक्षणीय कसे बनविता येईल, यासाठी उद्यानाच्या अधिकाºयांनी तातडीने पावले उचलावीत.-पवन लोहिया, व्यापारी, पैठण
पैठणच्या उद्यानातील संगीत कारंजे बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:18 AM