औरंगाबाद : दलित पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ आहे. या चळवळीने समाजातील पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सध्याची परिस्थिती अनुकूल नसेलही. मात्र, पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात आपल्या आजूबाजूला काय चालले त्याकडे गांभीर्याने बघून वाटचाल करा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनी केले.
दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये रविवारी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संशोधक डॉ. सूरज येंगडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल आणि पोलिस अधिकारी प्रवीण मोरे यांचा सहभाग होता.
या वेळी दिलीप मंडल म्हणाले, स्वातंत्र्याच्या सुरुवातीपासून मागासवर्गीयांनी अनेक स्वप्ने बघितली होती. देश बदलेल. व्यवस्था बदलेल. पण, प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे मागासवर्गीयांनी स्वातंत्र्याची बघितलेली स्वप्ने तुटत गेली. सुरुवातीच्या काळात कमी संख्येने असलेल्या उच्चवर्णीयांनी शासकीय कार्यालयातील सर्व जागांवर कब्जा केला होता. मागासवर्गीयांची मुले शिकली, पण त्यांना नोकरी लागत नव्हती. जातिवाद कमी झाला नव्हता. अन्याय, अत्याचार कमी झाले नव्हते. या असंतोषातूनच दलित पँथरची सुरुवात झाली. अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ आणि महाराष्ट्रातील ‘दलित पँथर’ यांच्यात एकसारखे वैचारिक साम्य आहे. अमेरिकेत निग्रोंना अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. त्यामुळे त्यांनी मोठे आंदोलन उभारले. त्यात अनेक लोक मारले गेले. त्यानंतर अमेरिकी प्रशासन आणि उद्योग हादरले. तेथील सरकारने निग्रोंना सवलती देण्यास सुरुवात केली. त्याच पद्धतीने दलित पँथरने चळवळ उभारली.
प्रवीण मोरे म्हणाले, शेड्युल कास्ट फेडरेशनने सर्वप्रथम जातीविरोधी रणशिंग फुंकले होते. त्यातूनच दलित पँथरची बीजे रुजली. या परिसंवादाचे प्रास्ताविक सतीश पट्टेकर यांनी, तर राजेंद्र गोणारकर यांनी सूत्रसंचालन केले.
दलित पँथर ही आग आहेया वेळी सूरज येंगडे म्हणाले, पँथर मोठी होत गेली. नेतेही मोठे होत गेले. जिथे अन्याय-अत्याचार व्हायचे तिथे पँथर जाणार, हे कळताच प्रस्थापितांच्या मनात थरकाप उडायचा. पँथरचा असा धाक होता. मात्र, नंतर वैचारिक मतभेदामुळे पँथर बरखास्त झाली. यामध्ये विरोधकांचा हस्तक्षेप महत्त्वाचा होता. परंतु, दलित पँथर ही आग आहे. ती पिढ्यानपिढ्या जळत राहणार आहे.