औरंगाबाद : उष्माघाताने मराठवाड्यात आणखी दोघांचा बळी गेला. शिरडशहापूर (जि. हिंगोली) येथील शेतकरी गंगाधर दामाजी आकमार (५२) आणि चारठाणा (जि. परभणी) येथील कुंडलिक भिवाजी खाडे (६५) या दोघांचा सोमवारी उष्माघातानेमृत्यू झाला.
शिरडशहापूर येथील गंगाधर आकमार हे आपल्या शेतात बैलजोडीद्वारे शेती मशागतीचे काम करीत होते. दुपारी ४ वाजता त्यांनी बैलजोडी लावून शेतात वखर लावला होता. अचानक चक्कर आली व ते शेतातच बेशुद्ध पडले. संध्याकाळी घरी न आल्यामुळे घरच्यांनी शेतात शोध घेतला असता ते मृतावस्थेत आढळले. त्यांचे कपडे रक्ताने भरलेले होते. चारठाणा येथील कुंडलिक भिवाजी खाडे हे सोमवारी सकाळी गावातील टी.पॉईंटकडे जात असताना वाटेतच चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. ऊन लागल्यानेच कुंडलिक यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)पुणे ३८.९, लोहगाव ३९.९, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३८.२, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.२, नाशिक ३८.१, सांगली ३९.६, सातारा ४०.८, सोलापूर ४३, उस्मानाबाद ४३, औरंगाबाद ४२, परभणी ४६.१, बीड ४४, अकोला ४५.३, अमरावती ४५, बुलडाणा ४१.५, ब्रम्हपुरी ४६.७, चंद्रपूर ४६.४, गोंदिया ४४.८, नागपूर ४६.७, वाशिम ४३.८, वर्धा ४६.५, यवतमाळ ४५.