औरंगाबाद : गणेशोत्सवादरम्यानच ईद साजरी होत आहे. शिवाय मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ‘उचापती’खोर गुन्हेगारांना बोलावून त्यांची थेट पोलीस आयुक्तांसमोर परेड घेतली जात आहे. चार दिवसांमध्ये आतापर्यंत बारा गुन्हेगारांना आयुक्तांसमोर हजर करण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या काळात शहरात शांतता राहावी, यासाठी पोलिसांनी शहरातील उचापतीखोर आणि रेकॉर्डवरील ७०० जणांची यादी तयार केली. या लोकांविरोधात दंगा करणे, दहशत निर्माण करणे, तलवार, चाकूसारखे शस्त्र घेऊन फिरणे, मारहाण करणे, लुटमार करणे आदी स्वरुपाचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले. त्यानुसार प्रत्येक ठाण्यातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडून सहायक पोलीस आयुक्तांसमोर उभे करीत आहेत. त्याने व एका प्रतिष्ठित व्यक्तीने चांगल्या वागणुकीची हमी दिल्यानंतरच मुक्त केले जात आहे. खून, खुनाच्या प्रयत्नासह दहशत निर्माण करणाऱ्या २५ गुन्हेगारांना हजर करण्याचे आदेश आयुक्तांनी गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत १० ते १२ जणांची पोलीस आयुक्तांनी आपल्या पद्धतीने ओळख परेड करून घेतली. शिवाय उर्वरित गुन्हेगारांना रोज उचलून आणले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली. आतापर्यंत १५० हून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.दिवसभर बसवून ठेवल्यामुळे चांगलीच जरब...आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उचलून आणल्यानंतर त्यास गुन्हे शाखेतील एका खोलीत बसण्यास सांगितले जाते. यावेळी तो साहेब माझी काय चूक आहे ? मी अत्यंत शांत राहत असून, उचापती करणे सोडून दिले आहे, असे तो सांगत असतो. त्यावेळी पोलीस आयुक्त साहेबांनी तुला बोलावले आहे. साहेब सांगतील तेव्हा तुला त्यांच्यासमोर हजर केले जाईल. त्यानंतरच तुला येथे ठेवायचे अथवा सोडून द्यायचे याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जाते. बसविल्यानंतर सायंकाळी त्यास आयुक्तांसमोर हजर केले जाते.
शहरातील गुन्हेगारांची सीपींसमोर ‘परेड’
By admin | Published: September 10, 2016 12:13 AM