विजय माने , परंडापरंडा विधानसभा मतदारसंघ मागील दहा वर्षापासून आ. राहूल मोटे यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. मतदारसंघातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र मतदारसंघातून महायुतीला मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजयासाठी झुंजावे लागणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांना परंडा मतदार संघातून रविंद्र गायकवाड यांच्या पेक्षा केवळ साडेचार हजार मते कमी होती. यंदाच्या निवडणुकीत डॉ पद्मसिंह पाटील यांना परंडा मतदार संघातून ६६ हजार ६२८ मते तर रविंद्र गायकवाड यांना ९६ हजार ६३४ मते मिळाली असून महायुतीला तब्बल ३० हजाराचे मताधिक्कय मिळाले आहे. मताधिक्यात साडे सात पटीने वाढ झाली आहे. हे मताधिक्य तोडून महायुतीला रोखण्याचे मोठे आव्हान आ. राहुल मोटे यांच्यासमोर आहे. दोन वर्षापूर्वी शिवसेना-भाजपाच्या युतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं (आठवले गट) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सामिल झाल्याने युतीची महायुती झाली. परंडा विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील रिपाइं आठवले गटाचीही मोठी ताकद आहे. या निवडणुकीत शिवसैनिकांना सक्रिय करतानाच रिपाइंच्या गावपातळीवर असलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांनी महायुतीचे वर्चस्व वाढविले. त्यामुळेच जिल्हा परिषद निवडणुकीत पाच पैकी ३ जागा युतीने जिंकल्या. जिल्हापरिषदेत सेनेने काँग्रेसशी हात मिळवणी करीत अर्थ-बांधकाम सभापतीपद तालुक्याकडे खेचून घेतले. परंडा पालिकेवर भगवा झेंडा फडकावला. या वाढत्या ताकदीला मोदी लाटेची साथ मिळाल्याने शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळविले.२००९ च्या निवडणुकीत पडलेली मते्नराहुल मोटे : ८३४२५ (राष्ट्रवादी)शंकर बोरकर : ७७४२३(शिवसेना)सुरेश कांबळे : ८५४६तानाजी बनसोडे : १८६६राजगुरू कुकडे : १७१८ (बसपा)
परंड्यात महायुतीचा आत्मविश्वास दुणावला
By admin | Published: June 11, 2014 12:05 AM