औरंगाबाद : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रामदास कदम यांच्यामुळेच समांतर जलवाहिनीच्या योजनेचे वाटोळे झाल्याचा आरोप पुन्हा खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. मंगळवारी झालेल्या दिशा समिती, रस्ते सुरक्षा समिती आणि ग्रामीण विकासाशी निगडित समित्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
३० नोव्हेंबर रोजी समांतर जलवाहिनीबाबत स्वतंत्र बैठक होणार असल्याचे सांगून खासदार खैरे म्हणाले की, पक्षातील काही जणांनी कदम यांना योजनेबाबत उलटसुलट मार्गदर्शन केले. यानंतर कदम येथून गेले. मात्र, योजना बंद पडली. त्यांच्यामुळेच समांतर जलवाहिनी योजनेचे वाटोळे झाले असा आरोप करून तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांचादेखील ती योजना बंद करण्यात मोठा वाटा आहे असेही खासदार खैरे म्हणाले. योजनेच्या पुनरूज्जीवनाबाबत पक्षप्रमुखांना माहिती दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.