लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात बिनदिक्कतपणे रस्त्यावर दुकाने थाटून खुलेआम मटका सुरु असून शासकीय कार्यालय परिसरांसह प्रमुख बाजारपेठेतही मटक्याचा धंदा जोरात सुरु असल्याची बाब ‘लोकमत’च्या वतीने बुधवारी करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली आहे. परभणी शहरात गेल्या काही महिन्यांपासून सर्रासपणे मटका खेळला जात असल्याच्या तक्रारी होत्या. पोलिसांकडून काही पंटरवर कारवाईदेखील करण्यात येत होती. परंतु, या कारवाईत सातत्य राहत नसल्याने व मुख्य बुकीवर कारवाई होत नसल्याने मटक्याचा धंदा मोठ्या प्रमाणात शहरात वाढला असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी ‘लोकमत’कडे केल्या. त्या अनुषंगाने परभणी शहरात बुधवारी दोन पथकांच्या माध्यमातून स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. यामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. चक्क पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील काही टपऱ्यांवर मटका घेतला जात असल्याचे पहावयास मिळाले. याशिवाय अन्य काही शासकीय कार्यालय परिसर, मुख्य बाजारपेठ आदी ठिकाणीही मटका खेळला जात असल्याचे पहावयास मिळाले. एका पथकाने दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास रेल्वेगेट परिसरात पाहणी केली असता एका टपरीवर मटका घेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर रेल्वेस्थानक परिसरात एका पानटपरीवर जुगारी मटका घेत होते. पुढे एमएसईबी कार्यालय परिसरात एका पान टपरीवर तिघे जण मटका घेत होते. प्रतिनिधी पानटपरीवर गेला असता मटका घेणाऱ्यांनी सारवासारव केली. दुपारी दीड वाजता जिंतूररस्त्यावरील विसावा कॉर्नर परिसरात टपरीवजा दुकानामध्ये मटका घेणे सुरू होते. सदर प्रतिनिधीने स्वत: बुकीवर जात मटक्याची चिठ्ठी मिळविली. येथे मात्र खुलेआम मटका सुरु होता. त्यानंतर शहरातील रमाबाईनगर, आंबेडकरनगर, साखला प्लॉट भागात रेल्वे पटरीजवळ काही युवक मोबाईलच्या सहाय्याने मटका घेत असल्याचे दिसून आले. येथे मात्र चिठ्ठ्याऐवजी ओळखीच्या जुगाऱ्याकडूनच मटका घेत असल्याचे पहावयास मिळाले. त्यानंतर खानापूर फाटा परिसरातही खुलेआमपणे मटका सुरु होता. एमआयडीसी, जुने आरटीओ कार्यालय, प्रबुद्धनगर, अंबाभवानी कॉर्नर याही ठिकाणी खुलेआमपणे मटका सुरु होता. येथून पथकातील प्रतिनिधीने मटक्याची चिठ्ठी मिळविली. बुकी मालकानेही कसलीही चौकशी न करता बिन दिक्कतपणे मटक्याची चिठ्ठी दिली. त्यानंतर शहरातील ममता कॉर्नर एवन मार्केट परिसरात, सुपर मार्केट परिसरात एका पान टपरीवर मटका घेत असल्याचे पहावयास मिळाले. तर दुसऱ्या पथकाने केलेल्या पाहणीत दुपारी १ वाजेच्या सुमारास वांगीरोडवरील हडको पूल, भैय्यासाहेब नगर व पाण्याच्या टाकी परिसरात मटक्याच्या चिठ्ठ्या उघडपणे घेत असल्याचे पहावयास मिळाले. तसेच दीड वाजेच्या सुमारास धाररोड परिसरातील शंकर पॅलेस, गुरुवार बाजार, धारनाका परिसरात एक इसम मटक्याचे आकडे घेतांना आढळून आला. त्यानंतर १.५० वाजेच्या सुमारास जुना मोंढा परिसरात एका खोलीमध्ये दोन इसम मटका घेताना आढळून आले. येथून मटक्याची चिठ्ठी मिळविण्यात आली.
परभणीत खुलेआम मटका सुरु
By admin | Published: June 29, 2017 12:13 AM