परभणी : एलबीटी कराची वसुली करण्यासाठी मनपाने नेमलेली एजन्सी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी एलबीटी कार्यालय ते मनपापर्यंत मोर्चा काढण्यात आला. गुरुवारी सकाळपासून व्यापाऱ्यांच्या मोर्चामुळे मुख्य बाजारपेठेतील दुकाने पूर्णपणे बंद होती. एलबीटी वसुलीसाठी महानगरपालिकेकडून मुंबई येथील एका खाजगी एजन्सीला नेमणूक देण्यात आली आहे. या एजन्सीकडून व्यापाऱ्यांचे वार्षिक विवरणपत्र भरुन घेताना व त्याचे मूल्यांकन करताना व्यापाऱ्यांना वेठीस धरले जात आहे, असे कारण पुढे करुन ही एजन्सी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी व्यापारी महासंघाने गुरुवारी मोर्चा काढला. एलबीटी कार्यालय ते महानगरपालिकापर्यत मुख्य बाजारपेठेतून मोर्चा निघाला. या मोर्चात खा.संजय जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, नितीन वट्टमवार, सचिन अंबिलवादे, विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे, अनिल डहाळे, गोविंद पारटकर यांच्यासह शेकडो व्यापारी सहभागी झाले होते. मोर्चा मनपा कार्यालयासमोर आल्यानंतर मनपाच्या मुख्य इमारतीसमोर व्यापारी महासंघाने मोर्चाबाबतची भूमिका स्पष्ट केली. १५ ते २० मिनीट मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी मुख्य गेट समोर उभे केले. यानंतर महापौर संगीता वडकर यांच्या कक्षात खा. जाधव यांनी आयुक्त राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केली. चर्चेमध्ये महापौर वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, स्थायी समिती सभापती गणेश देशमुख, सभापती सुनील देशमुख, सचिन देशमुख, राजेंद्र वडकर यांच्यासह पदाधिकारी, व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. ही एजन्सी रद्द करण्यात यावी, अशी मागणी खा. जाधव यांनी रेखावार यांच्याकडे केली. व्यापारी महासंघाच्या वतीने प्रशासन व लोकप्रतिनिधींना मागणीचे निवेदन देण्यात आले.एक तास चाललेल्या चर्चेत व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत ही एजन्सी त्वरित रद्द करा, एजन्सी रद्द न केल्यास बाजारपेठ निर्णय होईपर्यंत बंद ठेवू, अशी भूमिका मांडली. खा. जाधव यांनी एजन्सीच्या कामकाजाला विरोध केला. व्यापाऱ्यांची कर भरण्याची तयारी आहे. मात्र कर भरताना एजन्सी ज्या जाचक अटी लावत आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांची गळचेपी होत आहे, असे ते म्हणाले. आयुक्त रेखावार यांनी एलबीटीच्या एजन्सीबाबतची भूमिका स्पष्ट केली. दुपारी १ वाजेच्या सुमारास मनपा प्रशासनाने कुठलाही ठोस निर्णय न घेतल्याने खा.संजय जाधव यांनी बैठकीत व्यापाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरु व महापालिकेला ही एजन्सी रद्द करण्यास भाग पाडू, असे सांगितले. त्यामुळे झालेल्या प्रकारानंतर स्थायी समिती सभापती देशमुख यांनी याबाबत येत्या सात दिवसांत विशेष सभा बोलावून एजन्सीचे काम, एजन्सीबाबची माहिती व एजन्सीविषयी घ्यावयाचा निर्णय याची त्या सभेमध्ये घोषणा करण्यात येईल, तो पर्यंत व्यापाऱ्यांनी मनपला सहकार्य करावे, असे आवाहन सभापती देशमुख यांनी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी मनपा कार्यालय सोडले. (प्रतिनिधी)
परभणीत व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेवर मोर्चा
By admin | Published: February 18, 2016 11:32 PM