राम शिनगारे
औरंगाबाद : कोरोनाच्या नियमांमुळे बारसह दारूची दुकाने ४ वाजताच बंद करण्यात येत आहेत. मात्र त्यानंतरही पार्सल सेवा सुरू असल्यामुळे रस्त्याच्या कडेला आडोसा असेल अशा ठिकाणी दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे रिॲलिटी चेकमध्ये आढळून आले आहे.
कोविडच्या नियमामुळे दुपारी ४ वाजता दारू, बारसह इतर दुकाने बंद करण्यात येत आहेत. यानंतर हॉटेलसह बारमधील पार्सल सेवा सुरू असते. या पार्सल सेवेचा फायदा तळीराम उचलत असल्याचा प्रकार पाहणीत आढळून आला. तसेच अनेक दारूची दुकाने अर्धे शटर उघडे ठेवून सर्रास सुरू असतात. काही वेळी मागच्या दाराने मालाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे समोरून बंद असलेले दुकान तळीरामांसाठी सुरूच असते. प्रत्यक्ष बारमध्ये बसून दारू पिता येत नसल्यामुळे पार्सल घेऊन जातात. हे पार्सल घेऊन अनेक तळीराम आडोसा असलेल्या रस्त्याच्या कडेला, निर्जन स्थळी पीत बसलेले असतात. त्याचा त्रास नागरिकांनाही होत आहे.
चौकट
शहरानूरवाडी परिसरात अधिक प्रमाण
शहानूरवाडी परिसरातील उड्डाणपूल, रेल्वे पटरी, मोकळ्या मैदानावर तळीराम बसलेले असतात. या परिसरातून ये-जा करणाऱ्या महिलांना याचा अधिक त्रास होत असल्याचेही दिसून आले.
पोलीस स्टेशन : सातारा, वेदांतनगर आणि जवाहरनगर
चौकट
मोंढा नाका उड्डाणपूल
मोंढा नाका उड्डाणपुलाच्या खालीही तळीराम दिवसा आणि संध्याकाळच्या वेळी दारू पीत बसलेले असल्याचे पाहायला मिळते. याशिवाय याच परिसरात असलेल्या मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या भिंतीच्या आडोशाला अनेक जण बसलेले असतात. त्या ठिकाणी चिअर्सही करतात. या तळीरामांना कोणीही जाब विचारत नसल्यामुळे बिनधास्त कार्यक्रम सुरू राहतो.
पोलीस स्टेशन : क्रांती चौक, उस्मानपुरा
.....
चौकट
मध्यवर्ती बसस्थानक परिसर
मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील आडोशाच्या जागा, बसस्थानकाच्या समोर असलेला स्कायवॉक, बाभळीची झाडांमध्ये बसून अनेक तळीराम कार्यक्रम करीत बसलेले असतात. या तळीरामांना कोणी विचारत नसल्यामुळे निर्ढावलेपणा वाढल्याचेही परिसरातील नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
चौकट
तीन दिवसात आठ गुन्हे
पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलीस ठाण्यात अवैधपणे दारू विक्री करणारे, दारू घेऊन जाणाऱ्या आठ जणांवर मागील तीन दिवसात गुन्हे दाखल केले आहेत. यावरून रस्त्यावर दारू पिणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.
प्रतिक्रिया
आळा घातला पाहिजे
आमच्या घराच्या परिसरात तळीरामची ये-जा सतत सुरू असते. या लोकांना दारूची दुकाने बंद झाल्यानंतरही बिनधास्त दारू उपलब्ध होते. यामुळे परिसरातील शांततेलाही धोका निर्माण होत आहे. या लाेकांना आळा घातला पाहिजे.
- सिद्धार्थ वडमारे, नागरिक, पुंडलीकनगर
----------------------------
दारू मिळतेच कशी?
नियमानुसार दुकाने बंद केल्यानंतर दारू मिळतेच कशी? या दुकानदारांना कोणाचे अभय आहे, हे आधी तपासले पाहिजे.
- संतोष कवळे, नागरिक