बीड : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने एक हजार पारधी कुटूंबियांना दिवाळीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली आहे. चार वाहनांमधून तांड्यावर जाऊन त्यांना मिठाई देण्यात आली आहे. दरम्यान, तत्कालिन अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी हा उपक्रम सुरू केला होता. अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनीही हा पायंडा पुढे चालविला आहे.पारधी समाजाच्या लोकांना पोलिसांची भीती असते. पोलिस व पारधी यांच्यातील दरी भरुन काढण्यासाठी हा उपक्रम गेल्या चार वर्षापासून राबविण्यात येतो. मंगळवार पासून तांड्या-वस्तीवर जाऊन पारधी समाज व दिवाळीपासून वंचित असणाऱ्या लोकांना मिठाई वाटप करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सी.डी.शेवगण यांनी दिली.दिवाळीची मिठाई वाटप करण्यासाठी दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून चार वाहनांद्वारे हे काम सुरु असल्याचेही शेवगण म्हणाले.बुधवारी सकाळी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते पारधी महिलांना मिठाई वाटप करण्यात आली. त्यामुळे या महिला हरखून गेल्या होत्या. (प्रतिनिधी)
पोलिसांनी केली पारधी कुटुंबियांची दिवाळी गोड
By admin | Published: October 22, 2014 11:28 PM